Pimpri : आता रुग्ण अन् रुग्णालयांमध्ये समन्वय साधणार आरोग्य मित्र

आरोग्य मित्र रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहचविण्यासाठी मदत करणार

एमपीसी न्यूज – रस्ते अपघातात योग्यवेळी रुग्णालयात पोहचायला विलंब होत असल्याने आणि तातडीने उपचार मिळत नसल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने जीवनावर बेतू शकते. आता अपघातात जखमी झालेल्यांना योग्यवेळी रुग्णालयात पोहचविण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ मदत करणार आहेत. रुग्ण, रुग्णालय अन्‌ डॉक्टरांमध्ये समन्वय साधण्याचे काम आरोग्य मित्र करणार आहेत. पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, भावसार व्हीजन इंडिया, लोकमान्य हॉस्पिटल, रोशनी, कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन या संस्थांनी ‘आरोग्य मित्र’ हा स्तुत्य उपक्रम सुरु केला असून या उपक्रमाचा आज (रविवारी)जागतिक आरोग्य दिनाचे निमित्त साधत शुभारंभ करण्यात आला.

पिंपरी, संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच)रुग्णालयात रविवारी या उपक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील धर्मादाय आयुक्तलयातील अधिक्षक अभिजीत आनप होते. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. दिलीप कानडे, लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. आशिष सूर्यवंशी, निमाचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील व्यासपाठीवार उपस्थित होते.

  • रुग्ण, रुग्णालय अन्‌ डॉक्टरांमध्ये समन्वय, दुवा साधण्याचे काम आरोग्य मित्र करणार आहेत. रुग्णाला रुग्णालयात वेळेत पोहचविण्याचे समाजकार्य आरोग्य मित्र पार पाडणार आहेत. त्याचबरोबर केंद्र, राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांची जनजागृती करणार आहेत. उपचारासाठी कोठून आणि कशी मदत मिळवायची याबाबत देखील रुग्णांना माहिती दिली जाणार आहे.

या आरोग्य मित्रांना लोकमान्य रुग्णालयात सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर योग्यता तपासण्यात येईल. त्यानंतर आरोग्य मित्राचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. रस्ते अपघातातील जखमींना व्यवस्थित हाताळून योग्यवेळी रुग्णालयात पोहचविण्याचे काम आरोग्य मित्र करणार असून हृदयविकार, छातीत दुखणे, मधुमेह याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

डॉ. पवन साळवे म्हणाले, ”माणसाची मानसिकता चांगली असल्यास तो आजाराला सामोरे जाऊ शकतो. त्यासाठी मानसिक आरोग्य व्यवस्थित राहणे गरजेचे आहे. व्हॉटस्‌अॅप, इंटरनेटच्या आहारी तरुणपिढी गेली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यवर परिणाम होऊ शकतो. त्यातून त्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान आणि ज्ञानामुळे आरोग्य सेवा विकसित होत आहे. परंतु, सर्वसामान्य माणसांपर्यंत सरकारच्या विविध योजना पोहचत नाहीत. त्यासाठी सरकारच्या योजनांची जनजागृती करावी. नवीन पिढीला या योजनाचा चांगला उपयोग होईल”

”आरोग्य मित्रांनी रुग्णांना योग्यवेळी उपचार मिळण्यासाठी मदत करावी. रुग्ण आणि रुग्णालय यांच्यात समन्वय साधण्याचे काम चोखपणे करावे. त्यासोबतच आजार होऊ नये यासाठी योगा यासह व्यायामाचे महत्व पटवून देण्याचे महत्वपूर्ण काम पार पाडावे”, असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले.

  • डॉ. आशिष सूर्यवंशी म्हणाले, “आजार होऊ नये यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. उतरवयातील नागरिक पडतात. त्यांना व्यवस्थित हाताळून रुग्णालयापर्यंत नेणे गरजेचे आहे”

भावसार व्हीजनचे लक्ष्मीकांत भावसार यांनी आरोग्य मित्र या संकल्पनेची भूमिका समजावून सांगितली. योग्यवेळी उपचार मिळाले नाही. तर, जीवनावर बेतू शकते. वेळेत उपचार न मिळाल्याने रस्ते अपघातात सन 2017 पर्यंत 1 लाख 50 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने दुखापत होऊन आजार बळावतो. संकटकालीन आरोग्यविषयक परिस्थितीत उपचार मिळण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ काम करणार असल्याचे भावसार यांनी सांगितले.

  • लायन्स कल्बचे डॉ. ललित धोका, महापालिकेच्या महिला आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा डांगे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, डॉ. शैलजा भावसार, डॉ. व्यंकटेश तपशाळकर, राजीव भावसार, अॅड. दिलीप हांडे, भावसार व्हिजनचे गर्व्हनर किशोर बेंद्रे, रमेश गोंदकर, कसबा गणपतीच्या विश्वस्त संगीता ठक्कार, भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त संजीव जावळे, पिंपरी-चिंचवड नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा सविता निगडे, उज्वला केळकर, डॉ. मोहन गायकवाड यावेळी उपस्थित होते. आरोग्य मित्र या संकल्पनेचे जनक प्रवीण निकम यांनी या संकल्पनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभय कुलकर्णी यांनी केले. तर, गणेश जवळकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.