Pimpri : दिघी, वडमुखवाडी, मोशी परिसरात संरक्षण विभागाच्या जागेत अनधिकृत प्लॉटिंगचे लोण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील दिघी, वडमुखवाडी आणि दिघी परिसरात संरक्षण विभागाची जमीन असल्याने त्या परिसरातील काही भागात प्लॉटिंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही काही बांधकाम व्यावसायिक तसेच भूखंड मालक मोठमोठ्या भूखंडांवर प्लॉटिंगचा घाट घालत आहेत. त्यामुळे प्लॉटिंग करणा-यांना रीतसर परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ते प्लॉट विकत घेणा-यांना संबंधितांकडून प्लॉटिंगची कागदपत्रे तपासून घेण्याचे देखील सांगण्यात आले आहे.

दिघी, वडमुखवाडी आणि मोशी या परिसरात मोठ्या प्रमाणात संरक्षण विभागाचा भूखंड आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्या भूखंडाच्या आसपासच्या भूखंड क्षेत्रावर प्लॉटिंग करण्यास सक्त मनाई आहे. तरीही महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतल्याशिवाय प्लॉटिंगचे काम सुरु आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून याबाबत भूखंडधारक व खरेदी करणा-या नागरिकांना आवाहन करण्याबाबतचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दिघी, वडमुखवाडी आणि मोशी या परिसरात महापालिकेची परवानगी न घेता भूखंड मालक मोठमोठ्या भूखंडांवर प्लॉटिंग करीत आहेत. त्यात अंतर्गत कच्चे रस्ते देखील करीत आहेत. हे भूखंड संरक्षण विभागातील असल्याने महापालिका विकास नियंत्रण नियमानुसार त्या ठिकाणी जागेची उपविभागणी किंवा बांधकाम करण्यास परवानगी नाही.

प्रतिबंधित क्षेत्रात बांधकाम केल्यास त्यावर महापालिका कारवाई करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या मंजूर विकास आराखडा पाहून पुढील व्यवहार करावेत, असेही आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.