Pimpri: स्मार्ट सिटी कंपनी अन् ठेकेदारांचे संगनमत, निर्णयांची चौकशी करा; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत प्रचंड अनागोंदी सुरु आहे. स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ आणि ठेकेदारांमध्ये ‘मिलीभगत’ आहे. ठरवून ठेकेदाराला काम दिले जाते. त्यामुळे एक समिती गठित करुन पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने आजपर्यंत घेतलेल्या निर्णयांची, केलेल्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली आहे. तसेच स्मार्ट सिटीत ‘स्मार्ट एरिया’च विकसित केला जात असून केवळ दिखाव्यासाठी काम केले जात असल्याचा आरोपही बारणे यांनी केला.

लोकसभेत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, देशभरातील  अनेक शहरांमध्ये स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहराचा देखील स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. या योजनेचे काम शहरात सुरु आहे. त्यासाठी एका समिती स्थापन केली आहे. या समितीद्वारे ठेकेदार निश्चित केला जातो. त्याला काम दिले जाते. समिती आणि ठेकेदारांमध्ये ‘मिलीभगत’ असल्याने ठरवून ठेकेदाराला काम दिले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे. स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट एरियाच विकसित केला जात आहे. ज्या भागात विकासाची आवश्यकता आहे. त्या भागात स्मार्ट सिटीअंतर्गत अतिशय कमी कामे केली जात आहेत. प्रत्यक्षात या योजनेचा फायदा शहरातील अविकसित भागात होणे अपेक्षित आहे. परंतु, स्मार्ट भागालाच या योजनेचा फायदा होत आहे, असा आरोप बारणे यांनी केला.

स्मार्ट सिटीची योजना केवळ दिखाव्यासाठी काम करत आहे. ज्या शहरात या योजनेचे काम चालू आहे. त्यासाठी एक समिती गठित करावी. खासकरुन पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीसाठी तातडीने एक समिती गठित करावी. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या समितीने आजपर्यंत घेतलेल्या निर्णयांची, कामांची चौकशी करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी लोकसभेत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.