Pune : कोरोना रक्त तपासणीसाठी हॉस्पिटलच्या नावांची व्हायरल होणारी यादी ‘फेक’; आरोग्य विभागाकडून खुलासा

एमपीसी न्यूज – कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी करण्यासाठी महाराष्ट्रातील रुग्णालयांच्या नावांची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही यादी फेक असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यासाठी रक्त तपासण्याची आवश्यकता नसून रुग्णाच्या घशाचा द्राव (नसो फैरिंजीयल स्वाब) तपासण्यात येतो. असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे.

राज्यात कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. संबंधित रुग्णाचा घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथे राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय या तीन ठिकाणी सोय उपलब्ध आहे. याच तीन ठिकाणी सध्या तरी कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात. पुढील काही दिवसात ही सुविधा मुंबई केईएम रुग्णालय, मुंबई, हाफकीन यांच्यासह चार ते पाच ठिकाणी वाढविण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत आहे. कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.