Pimpri: ‘जलद प्रतिसाद टीम’ला माहिती देवून सहकार्य करा, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने जलद प्रतिसाद पथकांची स्थापना केली आहे. या पथकाने विचारलेली माहिती देऊन त्यांनी सांगितलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये दहा पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता जलद प्रतिसाद पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये नियुक्त केलेल्या कर्मचा-यांना महापालिकेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे या पथकाला प्रशिक्षण दिले. या पथकाने कशा पद्धतीने काम केले पाहिजे याची माहिती प्रशिक्षणामध्ये देण्यात आली.

स्थापन करण्यात आलेल्या जलद प्रतिसाद पथकामध्ये मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि कासारवाडी येथील साई शारदा महिला औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे 38 निदेशक, क्रीडा शिक्षक 35 , वैद्यकीय विभागातील 22 मल्टी पर्पज वर्कर आणि 64 ए.एन.एम. तसेच माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शाळांमधील 98 उपशिक्षक तर 30 सहाय्यक शिक्षक अशा एकूण 287 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या जलद प्रतिसाद पथकामध्ये एकूण चार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. त्यांनी शहरातील नेमून दिलेल्या भागांमध्ये जाऊन कामकाज करायचे आहे.

जलद प्रतिसाद पथकाला शासनाच्या मार्गदर्शक सूचना वेळोवेळी कळविणेत येतील. या पथकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन नागरिकांशी संवाद साधताना त्यांना देखील करोना सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यासाठी आवश्यक त्या सुचना द्याव्यात. तसेच नागरिकांशी उत्त्तम समन्वय ठेवून कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य पटवून द्यावे. ज्या ठिकाणी खासगी क्लासेस अथवा गर्दी करणारे कार्यक्रम सूरू असतील ते तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी. सर्वेक्षण करताना मिळालेली माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत गृहभेटी करून माहिती संकलीत करावी आणि तात्काळ नियंत्रण केंद्रास अहवाल सादर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.