Pimpri News: देशव्यापी संपामध्ये पुण्यातील सर्व कामगार संघटना होणार सहभागी; कामगार नेत्यांची माहिती

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – देशातील कामगार कायद्यांमध्ये मोदी सरकारने अत्यंत मूलभूत असे कामगार विरोधी बदल केल्याचा आरोप करत सर्व कामगार आणि शेतक-यांनी गुरूवार (दि.26) पुकारलेल्या एक दिवसीय संपाला आमचा पाठिंबा आहे. संपामध्ये पुण्यातील सर्व कामगार संघटना सहभागी होणार असल्याची माहिती शहरातील कामगार नेत्यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत दिली.

पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम, कामगार नेते अजित अभ्यंकर, इरफान सय्यद, व्ही. व्ही. कदम, एस. डी. गोडसे, टी. ऐ. खराडे, दिलीप पवार, वसंत पवार, किशोर ढोकले, अर्जुन चव्हाण, रघुनाथ कुचिक, मनोहर गडेकर, अरुण बोराडे, अनिल रोहम, प्रसाद काटदरे, योगेश कोंढाळकर, अरविंद जक्का आदी कामगार नेते उपस्थित होते .

देशात कामगार कायद्यांमध्ये मोदी सरकारने अत्यंत मूलभूत असे कामगार विरोधी बदल केलेले असून, कामगारांची सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात आलेली आहे. करोना काळातील शांततेचा फायदा घेऊन अत्यंत बेलगामपणे संरक्षण –विमा-बँकांसारख्या मूलभूत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमदेखील विकून टाकण्याच्या देशविरोधी हालचाली सुरू आहेत. सर्वत्र कंत्राटीकरण सुरू आहे. करोना काळात कोट्यावधींचा रोजगार गेलेला आहे. त्यांना तात्काळ साहाय्य देण्याची गरज आहे.

त्याचवेळी शेतकऱ्यांना बड्या जागतिक व्यापारी कंपन्यांच्या दावणीला बांधणारे कायदेदेखील केलेले आहेत. या सर्वांच्या विरोधात देशातील सर्व कामगार आणि शेतकरी गुरूवारी एक दिवसाचा सार्वत्रिक संप करणार असल्याचे या कामगार नेत्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमधील इंटक, आयटक, सिटू, भारतीय कामगार सेना, श्रमिक एकता महासंघ, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, युटीयुसी, इत्यादी सर्व केंद्रीय कामगार संघटनांशी संलग्न तसेच स्वतंत्र कामगार संघटना; तसेच बँका, विमा, वीज मंडळ, संरक्षण इत्यादी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी; अंगणवाडी-आशा, आरोग्य परिचारक, तसेच सर्व योजना कर्मचारी, मार्केट यार्ड संबंधित सर्व कर्मचारी-हमाल आणि घर कामगार उस्फूर्तपणे, पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. ग्रामीण भागात शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून कृती करणार आहेत.

सध्याच्या करोना आपत्तीमुळे संपाच्या दिवशी कामगार-कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी बोलावून मोर्चे काढले जाणार नाहीत. त्याऐवजी कामगार-कर्मचारी तोंडाला मास्क बांधून, रस्त्याच्या दोन्ही बाजूस ओळीने, रहदारीस कोणताही अडथळा न करता, हातात मागण्यांचे फलक धरून काही एकमेकांपासून योग्य त्या अंतरावर उभे राहतील व मानवी साखळी करतील, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.