Pimpri news: मिलिंदनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मिलिंदनगर, पिंपरी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारत क्र. ए 2 मधील पाच सदनिकांचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (बुधवारी) प्रातिनिधीक स्वरूपात हस्तांतरण पार पडले.

यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य संदिप वाघेरे, नगरसदस्या उषा वाघेरे, निकिता कदम, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उपअभियंता अनघा पाठक, माहिती व जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच अन्य लाभार्थींना सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या घराचा वापर स्वत: करावा.

जेएनएनयुआरएम आणि बीएसयुपी अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने मिलिंदनगर, पिंपरी येथे 5 इमारती बांधण्यात आल्या होत्या. त्यातील 2 इमारतीमधील सदनिकांचे हस्तांतरण आज सुरु झाले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मोठा कार्यक्रम टाळून प्रातिनिधिक स्वरूपात शेखर महाडीक, अशोक राजपूत, चॉंद खान, कासिमबी पठाण आणि सुनंदा साबळे या पाच जणांना सदनिका हस्तांतरण करण्यात आल्या.

या दोन इमारतींमध्ये प्रत्येकी 112 सदनिका आहेत. इमारतीमध्ये जिन्याबरोबरच लिफ्टचीही व्यवस्था आहे. 270 चौरस फुटाच्या चटई क्षेत्राच्या सदनिकांमध्ये हॉल, किचन आणि शौचालय व बाथरुमचा समावेश आहे. सात मजली इमारतीच्या तळ मजल्यावर वाहनतळाची व्यवस्था आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.