Pimpri News: भाजपसाठी ‘अमृत’ योजना बनली भ्रष्टाचाराचे कुरण, 122 कोटींची निविदा रद्द करा – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज – अमृत योजनेअंतर्गंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत महापालिकेच्या विविध प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु, अमृत योजना  सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारी आणि अपारदर्शी यंत्रणेमुळे अमृत योजनेतील ड्रेनेज व्यवस्थेचे 148 कोटींचे काम बारगळले आहे. तेच काम पूर्ण करण्यासाठी आणखी 122 कोटी रुपयांचे काम काढण्यात आले आहे.  एकाच कामासाठी दोन वेळा खर्च करून पालिकेची आर्थिक लूट करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे  यांनी केला आहे.

संजोग वाघेरे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, अटल मिशन योजनेअंतर्गंत पिंपरी-चिंचवड महापालिकेने 148 कोटी रुपयांचे काम शहरात जुन्या सांडपाणी नलिका काढून तेथे नवी नलिका टाकणे आणि चिखली, बोपखेल आणि पिंपळे निलख येथे तीन एसटीपी प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले. पहिल्या वर्षी सत्ताधा-यांनी याची निविदा काढली होती. हे काम 2018 मध्ये प्रत्यक्षात सुरू झाले होते. तेव्हापासून दरवर्षी 12 महिने शहरात खोदाई चालू असताना मुदतीत हे काम पूर्ण करता आलेले नाही. या कामावर सव्वाशे कोटींहून अधिक खर्च झालेला असताना काम अर्धवट स्थितीत आहे. पालिकेच्या ड्रेनेज विभागाने हे काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानंतर 148 कोटी रुपयांच्या निविदेत समाविष्ट असलेली सांडपाणी नलिका टाकणे व एसटीपी उभारण्याच्या कामसाठी आणखी 122 कोटी रुपयांची निविदाप्रक्रिया सुरू केलेली आहे. शहरवासीयांच्या डोळ्यात धुळफेक करणारा हा सर्व प्रकार आहे. या आधीच्या निविदेत प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा संशय या प्रकारावरून निर्माण होत आहे. एकाच कामासाठी दोन निविदा काढून पालिकेची तिजोरी लुटण्याचा हा डाव दिसतो आहे. या कारणाने तात्काळ ही चालू निविदाप्रक्रिया रद्द करावी. तसेच ड्रेनेज विभागाने अमृत योजनेअंतर्गंत केलेल्या संपूर्ण प्रकल्पाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबधित दोषी आढळणा-या सर्व संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.