Moshi News: पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प महत्वाचा ठरणार – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, बांधकाम राडारोडा व्यवस्थापनामुळे पर्यावरणाचा ऱ्हास व शहरातील बांधकाम राडारोडा कमी होण्यास मदत होणार आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प महत्वाचे ठरणार आहेत, अशी माहिती महापौर उषा  ढोरे यांनी दिली.

महापौर ढोरे यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमवेत आज (गुरुवारी) मोशी कचरा डेपो येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प व बांधकाम राडारोडा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह शाखा अभियंता एस.बी.शितोळे तसेच या प्रकल्पाचे मे. टंडन अर्बन सोल्युशन प्रा.लि कंन्सल्टंटचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाबरोबरच मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (MRF), मेकॅनिकल कंपोस्ट प्लॅन्ट च्या प्रकल्पाचीही पाहणी करण्यात आली. वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पात महापालिका हद्दीतील कचरा जागेवरुनच सुका व ओल्या कच-याचे वर्गीकरण होऊन आल्यास मोशी कचरा डेपो येथील ताण कमी होणार असल्याचे निदर्शनास आले. येत्या सप्टेंबर महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण होवून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. या प्रकल्पामध्ये 1000 टी.पी.डी क्षमतेच्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी उभारणे व 700 टी.पी.डी. क्षमतेचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प DBOT तत्वावर उभारण्याच्या कामाचा समावेश आहे.

हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर 14 मेगावॅट प्रति तास वीजनिर्मिती होवून महापालिकेच्या विद्युत खर्चात 30 ते 35 टक्के बचत होणार आहे. तसेच भविष्यात वाढणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बांधकाम राडारोडा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पामध्ये शहरात निर्माण होणाऱ्या बांधकाम प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या राडारोड्यावर प्रक्रीया करण्यात येणार आहे.

यावर प्रक्रिया केलेनंतर त्यापासून GSB, Wet Mix,  पेव्हींग ब्लॉक, डिव्हायडर, चेंबर कव्हर इत्यादी तयार करण्यात येणार आहे. हे काम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरु करण्याच्या सूचना दिल्या. सद्यस्थितीत हा प्रकल्प उभारणीचे काम प्रगती पथावर आहे. मार्च 2020 पासून बांधकाम राडारोडा गोळा करण्याची प्रक्रियाही चालू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बायोमायनिंग  प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा तातडीने उपलब्ध करुन घ्यावी. हे एक आकर्षक पर्यटनस्थळ निर्माण होईल असे नियोजन करावे. या ठिकाणी सुशोभिकरणाच्या दृष्टीने वेगवेगळी झाडे लावून वृक्षारोपण करण्यात यावे, अशा सूचना महापौर ढोरे यांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.