Pimpri news: रस्ते, गटार, साफसफाईची निविदा रद्द करा – तुषार कामठे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने रस्ते, गटार, साफसफाईची काढलेली निविदा खातेनिहाय चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याने प्रकाशित केली आहे. त्यामुळे ही निविदा तत्काळ रद्द करावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे की, आरोग्य विभागाची रस्ते, गटार, साफसफाईची निविदा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी काढली आहे. ते एका निविदेवेळी ठेकेदाराकडून लाच घेण्याच्या प्रकरणात अडकले आहेत. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु आहे.

असे असतानासुद्धा त्यांनाच निविदेचे अधिकार दिलेले आहेत. त्यांना निविदेचे आर्थिक अधिकार जरी प्रदान केले नसले, तरी त्यांना निविदा प्रकाशित करणे, करारनामा करणे, कार्यारंभ आदेश देणे असा प्रकारचे प्रशासकीय अधिकार दिले आहेत.

एखाद्या अधिका-याची खातेनिहाय चौकशी सुरु असताना प्रशासकीय अधिकार कायम ठेवणे हे चुकीचे आहे. या अधिकाराचा निविदा प्रकरणामध्ये ते गैरवापर करु शकतात.

त्यामुळे आरोग्य विभागाने काढलेली निविदा रद्द करुन नव्याने निविदा प्रकाशित करावी, अशी मागणी करत या निविदेचे अधिकार हे दुस-या सक्षम अधिका-याकडे द्यावेत. जेणेकरुन या निविदेत भ्रष्टाचार होणार नाही, असे कामठे यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.