Pimpri News: दंडात्मक कारवाईच्या पावतीत फेरफार; पालिकेच्या बीट निरीक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेकडून अतिक्रमणावर केल्या जाणा-या दंडात्मक कारवाईच्या पावतीत फेरफार करणा-या दोन बीट निरीक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी तसे आदेश दिले आहेत.

प्रियांका शिंदे,  दिपाली जगदाळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. या दोघीही बीट निरीक्षक आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कारवाईनंतर देण्यात येणाऱ्या पावतीमध्ये महापालिका कर्मचारी फेरफार करून महापालिकेची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

पावती देताना एक रक्कम दाखवली जात आहे तर ओसीवर दुसरी रक्कम दाखवून सर्वसामान्य लोकांची लूट करण्यात येत असल्याबाबत तक्रार प्राप्त होत आहेत. त्यानुसार पावत्यांची तपासणी करण्यात आली.  नागरिकाला दिलेल्या पावतीत दोन हजार रुपये आणि महापालिकेकडील पावतीतील एक हजार रुपयाची नोंद आढळून आली.

सामान्य पावती पुस्तकावरील नोंदीमधील तफावत असल्याबाबत शिंदे व जगदाळे यांनी खुलासा सादर केला. पण, हा खुलासा संयुक्तिक वाटत नाही असा अभिप्राय क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेला आहे. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी शिंदे व जगदाळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असा आदेश आयुक्त पाटील यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.