Pimpri News: शहराचा पॉझिटीव्ही रेट 3.53 टक्के, निर्बंध कमी करा; महापौरांची ‘सीएम’कडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णवाढीचा दर 3.53 टक्के इतका आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाचे निर्बंध कमी करणे आवश्यक आहे. कोरोनाचा कमी कमी होत असलेला पॉझिटीव्ही रेट, नागरिक, ग्राहकांची होणारी गैरसोय आणि व्यापारी वर्गात वाढत चाललेला असंतोष लक्षात घेऊन शहरातील सर्व व्यवसाय, दुकाने रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मागणी महापौर उषा ढोरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. त्यात महापौर ढोरे यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारच्या वतीने मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिकसारख्या मोठ्या शहरांना कोरोना निर्बंधातून दिलासा दिला दिला. तेथील दुकाने सात वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना वाढीचा दर 3.53 टक्के इतका कमी असूनही शहरातील निर्बंध कायम ठेवले आहेत. शहराचा कोरोना वाढीचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे शहराला निर्बंधातून सुट मिळणे अपेक्षित होते. परंतु, निर्बंध कायम ठेवले.

पिंपरी-चिंचवड शहर हे एक नामांकित औद्योगिक शहर आहे. मोठ्या प्रमाणात कामगार वास्तव्यास आहेत. कामगारांच्या सर्वसाधारण कामाच्या वेळा सकाळी सात ते सायंकाळी सहा दरम्यान असतात. राज्य सरकारने लागू केलेल्या सायंकाळी चार पर्यंतच्या निर्बंधामुळे कामगारांना कुठल्याही प्रकारची खरेदी करता येत नाही. शनिवारी, रविवारी पूर्णपणे बंद असते. व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे. असंतोषाचे वातावरण आहे. निर्बंधामुळे दुकाने बंद असल्याने व्यावसायीक हवालदिल झाले असून त्यांना कर्जाची परतफेड, दुकाने भाडे भरणे जिकरीचे झाले आहे. पर्यायाने व्यावसायिकांचे संपूर्ण कुटुंब आर्थिक विंवचनेत आली आहेत. या सर्व बाबींचा शहरातील आर्थिक उलाढालीवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.