Pune News : राज्य सरकारने पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये – गणेश बिडकर

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने करोनाचे निर्बंध कायम ठेवल्याने शहरातील व्यापारी वर्ग हैराण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. हे निर्बंध आता असेच ठेवून पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, अशी विनंती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना केली आहे. 

करोना संकटाचा सर्वाधिक फटका पुण्याला बसला आहे. करोनावर मात करण्यासाठी दीड वर्षापासून राज्य सरकारने घातलेल्या सर्व नियमांचे पालन शहरातील नागरिकांनी केले आहे. याचा परिणाम म्हणून पुणे आता या आजाराच्या मगरमिठीतून मोकळा श्वास घेऊ लागले आहे. सद्यस्थितीत शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या खाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्क्यांच्या खाली आहे. शहरात रुग्णसंख्या वाढल्यास त्यावर आवश्यक ते उपाय करण्यासाठी आरोग्य व्यवस्था सज्ज आहे. मात्र, असे असतानाही राज्य सरकार या  निर्बंधातून पुणेकरांची सुटका का करत नाही? असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे, असे सभागृह नेते बिडकर यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

करोनामुळे छोट्या-मोठ्या कंपन्यांतील आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. हॉटेल व्यवसाय डबघाईस आला आहे. मोठे मॉल्स कायमचे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे शहरातील व्यापारी वर्ग अक्षरशः हवालदिल झाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सर्वच घटकांना दिलासा देण्यासाठी निर्बंध उठविण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. निर्बंध कमी झाल्यानंतर आवश्यक ती खरबदारी घेत सर्व नागरिक जबाबदारीने वर्तन करतील यावर विश्वास ठेवायला हवा. धाडसी स्वभाव हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.  त्यानुसार कृती करून आपण या जाचक निर्बंधांमधून पुणेकरांची  सुटका करा, अशी मागणी बिडकर यांनी केली आहे.

जबाबदार वर्तन सांगायची गरज नाही – बिडकर

करोनामुळे अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे गेलेल्या पुणेकरांना जबाबदार वर्तन कसे असायला हवे,  हे सांगण्याची गरज नाही. निर्बंध हटवून त्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीत होतील यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याची गरज आहे, असे सभागृह नेते बिडकर यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.