Pimpri News: शहराचा बारावीचा निकाल 99.86 टक्के

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निश्चित केलेल्या मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता 12 वी चा निकाल आज (मंगळवारी) ऑनलाइन जाहीर करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 99. 86 टक्के इतका लागला आहे. मुलांचा 99.85 टक्के तर मुलींचा निकाल 99.87 टक्के इतका लागला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार हा निकाल लावण्यात आला. बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला. दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी केली. बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के निश्चित करण्यात आला. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या आणि मूल्यमापन यामधील विषयनिहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले गेले.

शहरामध्ये बारावीच्या एकूण 16 हजार 474 विद्यार्थ्यानी अर्ज भरले होते. यामध्ये 8 हजार 684 मुले आणि 7 हजार 790 मुली होत्या. यापैकी 16 हजार 451 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 8 हजार 671 मुले आणि 7 हजार 780 मुली उत्तीर्ण झाल्या. शहराचा एकूण निकाल 99.86 टक्के इतका लागला असून मुलांचा निकाल 99.85 टक्के, मुलींचा निकाल 99.87 टक्के इतका लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल 93.53 टक्के लागला होता. यावेळी मूल्यमापन पद्धतीमुळे 6 टक्क्यांने निकाल वाढल्याचे दिसून येत आहे.

मंडळाच्या वेबसाईटवरुन दुपारी चार वाजता विद्यार्थ्यांनी निकाल मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहिला. मुल्यामापन पद्धतीने निकाल जाहीर केल्यामुळे नेहमीसारखी मुलांच्या चेहर्‍यावर भिती नव्हती. फक्त पहिल्यांदाच अशाप्रकारे निकाल लागणार असल्याने उत्सुकता होती. निकाल मित्र – मैत्रिणींना फोन करुन शुभेच्छा दिल्या. पालक आणि नातेवाईकांनी देखील मुलांचे अभिनंदन केले. व्हॉट्सअपवर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.