Pimpri News: संभाव्य तिसरी लाट! उपाययोजनांसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – कोरोना आजाराच्या संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेसंदर्भात घ्यावयाची काळजी, तातडीने करावयाच्या उपाययोजना व रुग्णसंख्या कोणत्याही परिस्थितीत वाढू नये, रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे अशा विविध उपाययोजनांसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.

निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे कोविड वॉर रुमच्या मुख्य समन्वयकाची जबाबदारी दिली. महापालिका क्षेत्रातील सर्व वॉर रुम, क्षेत्रिय अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी, महापालिका मुख्य कार्यालय यांच्या समन्वय करणे, संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी आणि कोविड विषयक शासकीय आदेश, महापालिका आदेशाची अंमलबजावणी करणे, अ‍ॅन्टीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केंद्रांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे.

भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांच्याकडे माहिती संकलन समन्वयकाची जबाबदारी सोपविली आहे. महापालिकेच्या ‘मी जबाबदार’ अ‍ॅपमध्ये टेस्टिंग लॅब, सीसीसी सेंटर, हॉस्पिटल्स यांच्याकडून माहिती संकलन करणे, कोविड 19 पोर्टल, आयसीएमआर पोर्टलवरील महापालिकेची माहिती अद्ययावत राहील. यावर पर्यवेक्षण व नियंत्रण करणे.

क्रीडा विभागाचे उपायुक्त संदिप खोत यांच्याकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना शोधणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे शासकीय आदेशाप्रमाणे 100 टक्के कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, त्यांचे 100 टक्के टेस्टिंग होईल. त्यांची मी जबाबदार अ‍ॅपवर नोंदणी होईल. यावर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी दिली आहे.

आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त मंगेश चितळे यांच्याकडे जनजागृती समन्वयकाची जबाबदारी सोपविली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने संपूर्ण शहरामध्ये फलक, होर्डींग्ज लावणे, सर्व क्षेत्रीय कार्यालये, क्षेत्रीय स्तरावरील रुग्णालये यांच्याशी समन्वय ठेवणे. कोरोना संबंधित जनजागृतीसाठी वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मीडिया, सर्व माध्यमांच्या मदतीने नियोजन करणे. या विषयाशी संबंधित महापालिकेचे सर्व विभाग, शासकीय कार्यालये, मीडिया पार्टनर, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांचा समन्व करणे. कोविड संबंधित उपाययोजनांच्या नियोजनाची जबाबदारी चितळे यांना पार पाडावी लागणार आहे. या अधिकाऱ्यांना कामकाजाचा अहवाल आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना सादर करावा लागणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.