Pimpri News: वर्षानुवर्ष एकाच शाळेत ठाण मांडलेल्या शिक्षकांच्या बदल्या करा- महापौरांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यातून शहराचे भवितव्य घडणार आहे. त्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल. आजपर्यंत शिक्षकांचे लाड केले. यापुढे केले जाणार नाहीत, असे सांगत वर्षानुवर्ष एकाच शाळेत ठाण मांडलेल्या, तीन वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या तत्काळ बदल्या करा, असा आदेश महापौर उषा ढोरे यांनी आयुक्तांना दिला. तसेच जमीन खरेदी विक्रीचे काम करणा-या शिक्षकाला निलंबित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज (मंगळवारी) पार पडली. महापौर ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

विषयपत्रिकेवर महापालिकेचे काळभोरनगर येथील माध्यमिक विद्यालय खासगी संस्थेला चालवायला देण्याचा प्रस्ताव होता. त्यावरुन नगरसेवकांनी शिक्षण विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. नगरसेवकांच्या भावना लक्षात घेता महापौरांनी हा विषय फेटाळला.

महापौर ढोरे म्हणाल्या, विषय चांगला आहे. पण तो सर्वांशी चर्चा करुन सभागृहासमोर आणणे आवश्यक आहे. सर्व नगरसेवकांनी शिक्षणाबाबतच्या आपल्या भावना पोटतिडकीने मांडल्या आहेत.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण मिळाले पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. तसे शिक्षण मिळत नसेल, तर शिक्षकांची गय केली जाणार नाही. विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षकांनी प्रामाणिकपणे करावे. त्यासाठी शिक्षकांनी परिश्रम घ्यावेत.

बापाची मालमत्ता असल्याचा समज करुन एकाच शाळेत ठाण मांडून कोण बसत असेल, तर ते चालू देणार नाही. कोणाची गय करणार नाही. विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण देण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या धेंड्यांना एका जागेवरुन बदला.

तीन वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांची तत्काळ बदली करावी. शिक्षकांचे लाड आता पूरे झाले. आता लाड केले जाणार नाहीत. जमीन खरेदीचे काम करणा-या शिक्षकाला निलंबित करण्याचा आदेशही महापौरांनी दिला.

आम्ही मालक आहोत, याचे आयुक्त, प्रशासनाने भान ठेवावे !

पालिकेच्या अनेक मिळकती आहेत. या मिळकती कोणालाही वापरायला देण्यापूर्वी नगरसेवकांशी चर्चा करावी. विश्वासात घ्यावे. नगरसेवकांची परवानगी मिळाल्यानंतरच विषय सभागृहासमोर आणावा. आम्ही मालक आहोत, याचे आयुक्त, प्रशासनाने भान ठेवावे असेही महापौर ढोरे म्हणाल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.