Pimpri News : महामार्गांवरील स्पीडगनची कारवाई थांबवा – संदीप खर्डेकर

एमपीसी न्यूज – महामार्गावरून प्रवास करताना आरटीओ विभागाकडून छुप्या पद्धतीने स्पीडगन लावली जाते. त्याद्वारे प्रमाणापेक्षा जास्त वेगात वाहन चालवल्यास दंड ठोठावला जातो. ही कारवाई थांबवावी. तसेच अशा पद्धतीने कारवाई करायची असेल तर राज्यात महामार्गांची निर्मिती करणे थांबवा अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन दिले आहे.

 

संदीप खर्डेकर यांच्या निवेदनात म्हटले आहे कि, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजमंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या महामार्ग निर्मितीच्या घोषणा दररोज वाचायला आणि पहायला मिळत आहेत. पुणे – संभाजीनगर दीड तासात, पुणे-बेंगलोर तीन तासात, मुंबई – नागपूर सहा तासात असेही ऐकायला मिळते. समृद्धी महामार्गावर विविध मंत्री व नेत्यांनी किती वेगाने गाड्या चालविल्या याचेही वृत्त वाचायला मिळते. एकीकडे जागतिक दर्जाचे रस्ते बांधायचे, त्यातून विकासाला चालना मिळते असे म्हणायचे आणि दुसरीकडे आरटीओ,  महामार्ग पोलीस, वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून महामार्गांवर छुप्या स्पीड गन लावून वेग मर्यादा तपासायची आणि प्रचंड दंडाच्या पावत्या संबंधितांना पाठवायचा प्रकार सुरु आहे.

 

टोल नाक्याजवळ महामार्ग पोलिसांचे वसुली पथक उभे असते. टोल नाक्यावर पंधरा मिनिट ते अर्धा तास घालवल्यावर पुन्हा या वसुली पथकाला तोंड देण्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. कधीतरी अनवधानाने वाहनांचा वेग वाढला तर स्पीडगनने टिपला जातो आणि आता दंड भरा म्हणून तगादा लावला जातो. शासनाला नेमके काय अपेक्षित आहे ? न पेक्षा द्दृतगती महामार्गांची उभारणीच थांबवा आणि तसे पत्र राज्य सरकारतर्फे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजमंत्री नितीन गडकरी यांना पाठवावे.

भरमसाठ टोल भरून तुम्हाला 70 ते 80 च्या स्पीडनेच जायचे आहे,  अशी सर्व वाहन चालकांना राज्य शासनाने सूचना द्यावी. हे सगळेच अनाकलनीय आहे. त्यात एकच दिलासा की आपले अनेक मंत्री देखील या दंडास पात्र ठरले आहेत. नागरिकांवर लादलेला अनावश्यक दंड मागे घ्यावा, तसेच ही कारवाई थांबवावी अशी मागणी देखील खर्डेकर यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.