Pimpri News : अवैध वृक्षतोड विरोधात वृक्षप्रेमींचे सांकेतिक उपोषण, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील 5-6 वर्षापासून अवैध वृक्षतोड होत आहे. याबाबत वेळोवेळी आंदोलने करून कारवाईची मागणी करण्यात आली. पण, प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आश्वासन देऊन देखील कारवाई झाली नाही. तसेच अवैध वृक्षतोड देखील सुरू आहे. त्यामुळे याबाबत शहरातील वृक्ष प्रेमींनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गांधी जयंती (शनिवार, दि.02) दिवशी सांकेतिक उपोषण केले.

याबाबत माहिती देताना वृक्षप्रेमी प्रशांत राऊल म्हणाले, ‘शहरात मागील 5-6 वर्षापासून अवैध वृक्षतोड होत आहे. याबाबत त्यावेळी असणारे पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त तसेच विद्यमान पोलीस आणि पालिका आयुक्त यांना वेळोवेळी वृक्षतोडीची ठिकाणे दाखवली, आरोपी पकडून दिले. तरीही कारवाई झाली नाही. 05 जून रोजी याबाबत पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यासाठी निवेदन देण्यात आले. पण, पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्यास सांगितले.’

‘चार महिने उलटल्यानंतर देखील कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे पुन्हा उपोषण करण्याबाबत पोलिसांनी निवेदन देण्यात आले. यावेळी भोसरी पोलिसांनी कोरोना आणि इतर नियमावली दाखवत उपोषण करण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे गांधी जयंती दिवशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांकेतिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला. आणि शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांकेतिक उपोषण करण्यात आले. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.’

शहरात अवैध वृक्षतोड होत असून याबाबत पोलीस आणि पालिका दोन्ही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रशांत राऊल यांनी केला. वेगवेगळी निवेदन देण्यात आले, आंदोलन केले पण, केवळ कारवाईची आश्वासन दिले जाते आणि प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही. प्रशासन एकप्रकारे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप प्रशांत राऊल यांनी केला. येत्या काही दिवसांत देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांच्याकडे दाद मागणार असल्याचे राऊल म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.