Pimpri: लंच टाईमनंतर टाईमपास केल्यास शिस्तभंगाची कारवाई

महिन्यातून तीन वेळा उशिरा आल्यास एक रजा खर्ची टाकणार

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे परिपत्रक जारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनी दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर दोन वाजता वेळेवर जागेवर उपस्थित रहावे. वेळेवर उपस्थित न राहिल्यास, कार्यालयीन वेळेत कामाची जागा सोडून इतरत्र फिरल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. तसेच महिन्यातून तीन वेळा कार्यालयात उशिरा आल्यास एक किरकोळ रजा खर्ची टाकली जाणार आहे. ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. बायोमेट्रीक थम्ब प्रणालीद्वारे तीन वेळा उशिरा आल्यास कारवाई करण्याबाबत दुजाभाव करणा-या अधिका-यांवर कारवाई केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.

प्रभावी व लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कार्यालयात अधिकारी, कर्मचा-यांच्या दैनंदिन उपस्थितीसाठी बायोमेट्रीक थम्ब प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. तथापि, महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन शिस्तीचे व बायोमेट्रीक थम्ब प्रणालीचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुन्हा एखदा अधिकारी व कर्मचा-यांना शिस्त लावण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे.

कार्यालयीन वेळेत कामाची जागा सोडून इतरत्र फिरु नये. भोजनाची सुट्टी संपल्यानंतर दुपारी दोन वाजता वेळेत कार्यालयात हजर रहावे. अन्यथा अशा अधिकारी, कर्मचा-यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. अधिकारी, कर्मचा-यांनी कार्यालयात प्रवेश करताना दर्शनी भागावर ओळखपत्र लावावे. पदानुसार निश्‍चित केलेला गणवेश परिधान करावा.

अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब प्रणालीद्वारे हजेरी लावण्याबरोबच हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करणेही बंधनकारक आहे; मात्र काही अधिकारी, कर्मचारी बायोमेट्रीक थम्ब प्रणालीद्वारे हजेरी न लावता केवळ हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करतात. थम्ब करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. ही बाब अयोग्य आहे. एका महिन्यात तीन वेळा कार्यालयात उशिरा आल्यास संबंधितांची किरकोळ रजा खर्ची टाकावी. किरकोळ रजा शिल्लक नसल्यास अर्जीत रजा खर्ची टाकावी. ही कार्यवाही दरमहा करण्यात यावी.

याबाबत जारी केलेल्या आदेशाची नोंद सेवानोंद पुस्तकात घ्यावी व रजा वजावट करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील महिन्याच्या 15 तारखेपूर्वी प्रशासन विभागाकडे पाठविण्यात यावा. तसेच ज्या महिन्यात एकही अधिकारी, कर्मचारी उशिरा आले नसल्यास त्या महिन्याचा निरंक अहवाल देखील प्रशासन विभागाकडे पाठविण्यात यावा.

काही आहरण वितरण अधिकारी स्वत:च्या बाबत बायोमेट्रीक थम्ब प्रणालीद्वारे तीन वेळा उशिरा आल्यास कारवाई करत नाहीत. तसेच कारवाई न करण्याबाबत कनिष्ठ कर्मचा-यांवर दबाव आणतात. असा दुजाभाव करणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात येईल. याबाबतचे अहवाल सादर केले नसल्यास एक वेळ संधी म्हणून ते त्वरीत सादर करावेत.

बायोमेट्रीक थम्ब प्रणालीच्या सवलतीचे प्रशासन विभागाने जारी केलेले आदेश ग्राह्य धरण्यात येतील. विभागांनी परस्पर घेतलेली मान्यता किंवा तोंडी आदेश ग्राह्य धरले जाणार नाहीत. अधिकारी, कर्मचा-यांची बदली झाल्यास त्या विभागातील थम्ब मशिनवर थम्ब रजिस्ट्रेशन शाखा प्रमुखांच्या लेखी परवानगीने करण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.