Mumbai : भेसळखोरांना आता जन्मठेपेची शिक्षा – गिरीश बापट

एमपीसी न्यूज – दूध आणि अन्नाची भेसळ करणाऱ्या भेसळखोरांना आता जन्मठेपेच्या शिक्षा होणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी याच अधिवेशनात कायदा करणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत केली.

दूध आणि अन्नपदार्थांत भेसळ करणं यापुढे अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. विधानपरिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश बापट यांनी ही घोषणा केली.

यापूर्वी भेसळीच्या गुन्ह्यात फक्त सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद होती. आरोपींना जामीनही लगेच मिळत होता. त्यामुळे कायद्याचा धाक उरला नव्हता. मात्र आता दूध भेसळीला आळा घालण्यासाठी शिक्षेची नवीन तरतूद करण्यात येणार आहे.

दूध भेसळीबाबत विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मार्च महिन्यात गिरीश बापट यांनी दूध भेसळखोरांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्याचं आश्वासन दिले होते. त्यानंतर दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी अनेक आमदारांनी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.