Pimpri : पिंपरी-चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लब करणार ऑक्टोबरमध्ये माउंट मेरा शिखरावर चढाई

एमपीसी न्यूज- नेपाळ येथील 6470 मीटर (21681 फूट) उंच माउंट मेरा या हिमशिखरावर ऑक्टोबर महिन्यात पिंपरी-चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लब संस्थेने चढाई मोहीम आखली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात या मोहिमेची घोषणा करण्यात आली.

यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे , बी. व्ही. जी. ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, योगीराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर तापकीर, अप्पासाहेब सायकर उपस्थित होते.

गिरिप्रेमी आयोजित 2019 मधे होणाऱ्या माऊंट कांचनगंगा इको मोहिमेत पिंपरी-चिंचवड शहरातील एव्हरेस्ट शिखरवीर कृष्णा ढोकले यांचा सहभाग आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व कांचनगंगा मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लब संस्थेने ही मोहीम आखली आहे. या मोहिमेत एव्हरेस्ट शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्यासह डॉ. मिलिंद खाडिलकर, सतीश बुरडे, शिवाजी शिंदे, अभिजित लोंढे, अजय सायकर, विश्वनाथ कारमुडी, गौरव शर्मा असे एकूण 8 गिर्यारोहक चढाई करणात आहेत.

पिंपरी-चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लब गेल्या 6 वर्षांपासून शहरात गिर्यारोहण क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेने आज पर्यंत सह्याद्री व हिमालयातील विविध गिर्यारोहण मोहीमा यशस्वी केल्या आहेत. सह्याद्रीतील विविध ट्रेक, हिमालयातील मोहिमा व स्पोर्ट क्लायंबिंगच्या स्पर्धा आयोजित करून शहरातील नवोदित गिर्यारोहकांना घडविण्याचे कार्य संस्था करीत आहे. संस्थेने 2016 साली 15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्यदिनी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस सर करून त्यावर भारतीय तिरंगा ध्वज फडकविला होता. तसेच सह्याद्रीतील तैलबैल कातळ भिंत, काळकराई सुळका, खडापारशी सुळका, सरसगड, कोथळीगड व शिवगिरी कडा प्रस्तरारोहण चढाई मोहीमा यशस्वी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.