Pimpri : बायकोचा खून केल्याची कबुली अन पोलिसांची धावपळ

एमपीसी न्यूज – ‘मी बायकोचा चाकूने भोसकून खून केलाय, ती घरात मरून पडलीये’, अशी धक्कादायक कबुली त्याने दिली. त्याच्या या कबुलीमुळे पोलिसांची एकच भंबेरी उडाली. पिंपरीसह चिंचवड पोलिसांची दोन तास धावपळ झाली. पोलिसांनी बायकोच्या खुनाची कबुली देणा-या इसमाच्या घरात जाऊन पाहणी केली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण कबुली देणा-या इसमाची पत्नी घरात झाडून घेत होती. पोलिसांचा मोठा ताफा पाहून बायकोने संयमाने म्हटले, ‘साहेब तो वेडा आहे.’

सुदाम अर्जुन तोरड (वय 40, रा. आनंदनगर, चिंचवड) असे या मनोरुग्णाचे नाव आहे. त्याने सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन बायकोचा चाकूने भोसकून खून केल्याची कबुली दिली. त्याच्या या कबुलीमुळे पोलीस यंत्रणा चांगलीच कामाला लागली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. आनंदनगर परिसर चिंचवड पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी याबाबत चिंचवडचे पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांना माहिती दिली. शिंगाडे यांनी पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांच्यासह पिंपरी पोलीस ठाणे गाठले.

सुदामला घेऊन चिंचवड आणि पिंपरी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी आनंदनगर येथे निघाला. दरम्यान, पोलीस अधिकारी त्याच्याकडे चौकशी करीत होते. मात्र, सुदाम काहीच उत्तर देत नव्हता. खून केल्यामुळे तो सुन्न झाला असल्याचे गृहीत धरून पोलिसांनी त्याच्याकडील चौकशी थांबवली.

पोलिसांचा ताफा आनंदनगरमध्ये दाखल झाला. अरुंद गल्ल्यांमुळे सुदामच्या घरापर्यंत मोटार जाणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांनी मुख्य रस्त्यावर मोटार पार्क करून चालत जाण्याचा मार्ग निवडला. पोलीस सुदामच्या हाताला धरून गल्ल्यांमधून वाट काढत चालत होते. पोलिसांचा एवढा मोठा ताफा पाहून परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने गोळा झाले.

शेवटी एका छोट्या गल्लीतील पत्र्याच्या खोलीकडे बोट करून सुदामने इशारा केला. वातावरण सुन्न झाले होते. पोलिसांच्या मनात अनेक प्रश्न अन नागरिकांना कुतुहूल होते. आता घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पाहायला मिळणार या अपेक्षेने पोलीस निरीक्षक खुळे यांनी उघड्या दरवाजातून आत डोकावले असता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. एका महिला घरकाम करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तिला आवाज देऊन बाहेर बोलावले. पोलिसांचा एवढा मोठा ताफा अन समोर नवऱ्याला पाहून तिने पोलिसांना सांगितले, ‘साहेब तो वेडा आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.