Pimpri : पीएमपीएमएल बस चालकाला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना भोसरी एसटी स्टॉप जवळ मंगळवारी (दि. 27) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

किरण दगडू निटुरे (वय 35, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजीज सादिकअली सय्यद यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजीज हे पीएमपीएमएल मध्ये बस चालक म्हणून काम करतात. ते बुधवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास भोसरी एसटी स्टॉपजवळ त्यांच्या कर्तव्यावर होते. त्यावेळी एका कारमधून (एमएच 14 / बीएक्स 8468) आलेल्या तिघांनी अजीज यांना शिवीगाळ केली. तसेच आरोपींनी अजीज यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अजीज पीएमपीएमएल बसमधील चालक किरण संपत वाकचौरे हे आले. त्यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी किरण वाकचौरे यांना देखील मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.