Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वाहनचालक पोलिसांची कमतरता

वाहनचालक म्हणून काम करण्यास पोलीस कर्मचा-यांची नापसंती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे उपलब्ध वाहने चालवण्यासाठी वाहनचालकांची कमतरता आहे. वाहनचालक म्हणून काम करण्यासाठी पोलीस कर्मचारी नापसंती दाखवत आहेत. यामुळे परिवहन विभागाला आवश्यकतेपेक्षा निम्म्या वाहन चालकांवर सर्व वाहने चालवणे कठीण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सध्या 83 चारचाकी वाहने आहेत. या वाहनांवर आयुक्तालयात एकूण 86 वाहन चालक उपलब्ध आहेत. 166 वाहनचालकांची आयुक्तालयाला आवश्यकता आहे. मात्र अर्धेच वाहनचालक सध्या नियुक्त आहेत. त्यातील काही वाहनचालक पोलीस कर्मचारी सुट्टीवर असतात. त्यामुळे हजर कर्मचा-यांना 24 तास जरी कामाला लावले तरी सर्व वाहने धावणार नाहीत, अशी परिस्थिती सध्या पोलीस आयुक्तालयाची झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्थापन केलेल्या पोलीस आयुक्तालयाचा अडचणींचा गुंता अजूनही सुटलेला नाही. राजकीय मंडळी केवळ आश्वासने देत आहेत. अति वरिष्ठ पोलीस अधिकारी आयुक्तालयाच्या अडचणी केवळ ऐकून घेत आहेत. त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. खासगी कंपन्या आयुक्तालयाच्या मदतीला धावत आहेत. कंपन्यांनी काही वाहने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला दिली. त्यामुळे आयुक्तालयात नव्या वाहनांची भर पडली. आयुक्तालयात 86 मोटारसायकल आहेत. पोलीस स्टेशन आणि आवश्यकतेनुसार त्याची विभागणी करण्यात आली आहे. मात्र, भौगोलिक क्षेत्र मोठे असल्याने एवढ्या तोकड्या मोटारसायकलवर पेट्रोलिंग करणे पोलिसांना शक्य नाही. पोलीस कर्मचारी पेट्रोलिंगसाठी खासगी वाहनाने फिरताना दिसतात.

आयुक्तालयाच्या वाहनांसाठी दहा महिन्यानंतरही पेट्रोल पंप अथवा इंधनाची ठोस सोय झाली नाही. पुणे पोलिसांचा शिवाजीनगर येथे पेट्रोल पंप आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील वाहने आयुक्तालय स्वतंत्र होऊनही पुणे पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत आहेत. पुणे ग्रामीण मधून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आलेल्या तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, देहूरोड, चाकण, आळंदी या पोलीस ठाण्यांसाठी ग्रामीण भागातील खासगी पेट्रोल पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दूरच्या पोलीस ठाण्यांना सोयीचे झाले आहे.

पोलीस स्टेशन, साईड ब्रांच, पोलीस आयुक्तालयात अशी पोलीस कर्मचा-यांकडून क्रमशः कामासाठी पसंती दिली जाते. यामध्ये परिवहन विभागात काम करण्यासाठी पोलीस कर्मचारी अतिशय निरुत्साही दिसतात. पोलीस दलात दाखल होताना वाहन चालविण्याचा परवाना आणि अन्य बाबींचा उल्लेख केला जातो. त्यावेळी पोलीस दलात मिळेल ते काम करण्याची तयारी दाखवली जाते. मात्र प्रत्यक्षात काम करण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र आवडीनिवडी सुरु होतात. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वाहनचालक पोलीस कर्मचा-यांची कमतरता असल्यामुळे आता वाहने असूनही त्याचा उपयोग होत नसल्यासारखी परिस्थिती कधीकधी पाहायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.