Pimpri: संशयावरुन तरुणाला मारहाण करणाऱ्या कॉन्स्टेबलला पोलीस आयुक्तांचा ‘शॉक’

बॅटरी चोरीच्या संशयावरुन तरुणाला केली होती मारहाण

एमपीसी न्यूज – मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरण्याच्या संशयावरुन एका तरुणाला ताब्यात घेऊन बेदम मारहाण करणे, शॉक देऊन त्याच्याकडून आठ लाख रुपये उकळणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभम यांनी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश नाळे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत कर्मचाऱ्यांना जबरदस्त ‘शॉक’ दिला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार या कर्मचाऱ्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल रमेश नाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरणाऱ्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून एका तरुणाला ताब्यात घेतले. तरुणाकडे चौकशी करुन बेदम मारहाण केली. तसेच त्याला विजेचा शॉक देखील दिला होता.

चौकशीमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाकडे काहीच मुद्देमाल सापडला नाही. त्यामुळे नाळे यांनी तरुणाला ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करुन आठ लाख रुपये घेतले. तसेच नाळे यांनी केलेल्या कारवाईची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही.

दरम्यान, नाळे यांनी तरुणाला बेदम मारहाण करुन त्याला शॉक देऊन पैसे उकळल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. हा सर्व प्रकार तरुणाच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांसमोर आणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्तांनी रमेश नाळे आणि कारवाई दरम्यान असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शुक्रवारी सायंकाळी दिले. आयुक्तांच्या आदेशानुसार नाळे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.