Pimpri : ‘त्या’ आदेशाला कायमस्वरुपी स्थगिती द्या; महाराष्ट्र मजदूर संघटनेची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – माथाडी कामगारांनी सहकारी संस्था, पतपेढी किंवा सहकारी, राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची हप्त्याची रक्कम माथाडी कामगारांच्या वेतनातून माथाडी मंडळातर्फे घेण्यात येऊ नये, या सरकारच्या आदेशाला कायमस्वरुपी स्थगिती देण्याची मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली आहे. याबाबत माथाडी कामगार हिताचा निर्णय घेतला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी आश्वासत केल्याचे संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी सांगितले.

मुंबईत मातोश्री येथे महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या पदाधिका-यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. निवेदन देऊन या आदेशाला कायमस्वरुपी स्थगिती देण्याबाबत साकडे घातले.

  • यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद, आमदार सुरेश गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, सतीश कंठाले, गोरक्ष डुबाले, खंडू गवळी, मुरलीधर कदम, सहसचिव भिवाजी वाटेकर, सर्जेराव कचरे, रायरेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुजूमले, मातोश्री पतसंस्थेचे पांडुरंग कदम आदी उपस्थित होते.

यावेळी इरफान सय्यद म्हणाले, माथाडी कामगारांना स्थिरता देणारा महाराष्ट्र माथाडी आणि इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम 1969 हा कायदा आहे. परंतु, सरकारने अचानक कोणत्याही कामगार संघटनांना विश्वासात न घेता कायदा रद्दबातल केला होता. यामुळे माथाडी कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. याबाबत महाराष्ट्र मजदूर संघटनेने प्रखर विरोध केला. तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली. त्यानंतर राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी गुरुवारी (दि.8) रात्री या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

  • परंतु, तात्पुरती स्थगिती म्हणजे पुन्हा कायद्याची अमंलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. कायद्याची अंमलबजावणी केल्यास माथाडी संस्था मोडीत निघण्याची शक्यता आहे. त्यासाठी या कायद्याला कायमस्वरुपी स्थगिती देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत माथाडी कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. कामगारमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले असल्याचे सय्यद यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.