Pimpri : चित्रपट ” चुंबक ” भावनिक चुंबकत्व…..

Review of Marathi Feature Film

(दीनानाथ घारपुरे)

आपल्या जीवनात अनेक माणसे पदोपदी भेटत असतात, प्रत्येकाचे स्वभाव हे वेगवेगळे असतात, त्यातील काही माणसांचे स्वभाव एकमेकांशी आपोआप जुळले जातात, तसेच काही वेळेला योगायोगानं माणसे एकत्र येतात, भेटतात,, प्रत्येक भेटीची कारणे वेगळी असतात, अश्याच तीन भिन्न-भिन्न स्वरूपाच्या व्यक्तिरेखा एकत्र येतात, ज्या प्रमाणे दोन लोहचुंबके एकमेकाला चिकटतात त्याच प्रमाणे स्वभावाचे असते, दोन विरुद्ध स्वभावाची माणसे सुद्धा एकत्र येतात आणि आयुष्याचे गणित सोडवण्याचा प्रयत्न करतात, अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित अक्षय कुमार प्रस्तुत आणि केप ऑफ गुड फिल्म्स, कायरा कुमार क्रिएशन या संस्थेतर्फे निर्माते अरुण भाटिया, नरेन कुमार यांनी ” चुंबक ” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माते सुजाता एन कुमार, श्रेणी हे आहेत. दिगदर्शन संदीप मोदी यांचे लाभले असून कथा सौरभ भावे, संदीप मोदी यांची असून ओमकार यांच्या गीतांना साकेत कानेटकर यांनी संगीत दिलेले आहे. यामध्ये स्वानंद किरकिरे, संग्राम देसाई, साहिल जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हि कथा आहे ” प्रसन्ना, बाळू, आणि डिस्को ” या तीन जणांची, त्यांच्या व्यक्तिरेखा भिन्न-भिन्न आहेत, ” प्रसन्ना ” हि व्यक्तिरेखा स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे, हि व्यक्तिरेखा गतिमंद / मतिमंद अशी असून, साधा-भोळा असा हा गृहस्थ आहे. हा गतिमंद असला तरी तो तसा हुशार आहे, पण मानसिक दृष्ट्या तो मंदबुद्धी असा वाटतो, त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे, वाक्यामधील किंवा दोन शब्दांच्या मधील अर्थ त्याला समजून घेता येत नाही, साधा-भोळा असून त्याचा समोरच्या व्यक्तीवर विश्वास पटकन बसतो, प्रसन्ना हा त्याच्या मनामध्ये जे असते त्याप्रमाणे वागतो. समोर आलेली गोष्ट तो पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याची मानसिकता आणि गती हि मंद असल्याने त्याला अनेक संकटाला सामोरे जावे लागते, दुसरा माणूस जे सांगेल त्याचे तंतोतंत तो पालन करतो, त्याच्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात प्रसन्ना हा भोळा माणूस आहे त्याला दुनियादारीचा अनुभव नाही.

दुसरी व्यतिरेखा आहे बाळूची, हि भूमिका साहिल जाधव यांनी केली आहे, हा एका हॉटेल मध्ये वेटरचे काम करीत असतो, प्रत्येक व्यक्तीचे जसे स्वप्न असते तसे त्याचे एक स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला संधी मिळते, ती संधी घ्यायची कि नाही ते त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते, ती संधी स्वीकारताना आपल्या मन आणि बुद्धीला कधी कधी बाजूला ठेवावे लागते, कधीतरी त्याची किंमत मोजायची तयारी ठेवावी लागते, असे अनेक प्रश्न बाळूच्या समोर असतात, बाळू हा वयाने लहान नाही आणि मोठा पण नाही त्यामुळे त्याने घेतलेला निर्णय त्याच्या आयुष्याला वेगळेपण देऊन जातो,…

डिस्को ची व्यक्तिरेखा हि संग्राम देसाई यांनी सादर केली आहे, हा एक मोबाईल दुरुस्त करणारा मुलगा असून तो बाळूचा मित्र आहे. त्याच्या मनांत काही ना काही कल्पना आहेत, त्याने दुनियादारी पाहिलेली आहे, त्याला काही प्रमाणात माणसाची पारख आहे, या दुनियेत रहायचे असेल तर काही ना काही नफा होईल असा उद्योग केला पाहिजे असे त्याची विचारधारा आहे. आपण केलेला उद्योगात समोरची माणसे फसू सुद्धा शकतात आणि त्याला ” बिझनेस ” असे म्हणायचे. अश्या ह्या तीन विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा एकमेकात चुंबका प्रमाणे चिकटलेल्या आहेत.

आजकाल विविध प्रकारचे उद्योग अनेक मंडळी करीत असतात त्यामध्ये एकमेकाला फसवणे हा हेतू असू शकतो किंवा नसतो हे सांगता येणे खूप कठीण आहे, कमीत कमी किमतीची वस्तू जास्तीत जास्त किमतीला विकली जाते तरी घेणारा ती वस्तू काही तक्रार न करता ती वस्तू विकत घेतो, त्याला ” बिझनेस ” असे गोड नाव दिले जाते, बाळू आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले पैसे एका कंपनी मध्ये गुंतवतो पण तेथे त्याचे पैसे डुबतात, कंपनीच्या माणसांनी अनेकांचे पैसे घेऊन पळ काढलेला असतो, त्याच वेळी डिस्को बाळूला एका नव्या ” बिझनेस ” ची कल्पना सुचवतो, तो बिझनेस ” लॉटरी ” चा असतो, हा व्यवसाय कसा करायचा हे डिस्को बाळूला समजावून सांगतो सुरवातीला बाळूला हे पटत नाही पण शेवटी तो तयार होतो, एक सिम कार्ड खरेदी करून अनेक जणांना ” लॉटरी ” च्या जाळ्यात ओढण्याची योजना आखली जाते, त्यामध्ये प्रसन्ना नावाचा माणूस सापडतो, आणि हि व्यक्ती सोलापूर हुन मुंबईला लॉटरीचे पैसे घेण्यासाठी येते, तिघांची भेट होते, आणि मग त्या तिघांच्या जीवनात विविध प्रसंग घडायला सुरवात होते. एक खोटं बोललं कि त्याबरोबर अनेकदा खोटे बोलावेच लागते आणि ” प्रसन्ना – बाळू – डिस्को ” हे एकमेकांत ” चुंबकासारखे ” गुंतून जातात, एकमेकाला धरून आयुष्यातील विविध छटा असलेल्या नाटयमय प्रसंगाची मालिकाच सुरु होते, आणि शेवटी नेमकं काय घडते हे सिनेमात पाहायला मिळेल…..

दिगदर्शक संदीप मोदी यांनी चित्रपट बंदिस्तपणे सादर केला आहे, प्रसन्नाला – बाळू आणि डिस्को भेटतात इथून प्रसंगामध्ये उत्कंठा वाढत जाते, प्रसन्ना ची भूमिका स्वानंद किरकिरे यांनी उत्तमपणे सादर केलेली आहे, ह्या भूमिकेला विविध छटा आहेत त्या त्यांनी आपल्या देहबोली मधून संवादामधून उत्तम साकारलेल्या आहेत. बाळू ची भूमिका साहिल जाधव यांनी केली असून ती व्यक्तिरेखा व्यवस्थित समजून घेऊन भूमिकेच्या भावना व्यक्त केल्या आहेत. डिस्को च्या भूमिकेत संग्राम देसाई असून त्याने व्यक्तिरेखेचा बेरकेपणा देहबोली मधून दाखवला आहे.

एकंदरीत हा सिनेमा गुंतवत जातो, अक्षय कुमार प्रस्तुत ” चुंबक ” ह्या सिनेमाला प्रेक्षक पसंत करतील अशी आशा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.