Pimpri: गर्दी वाढल्याने कॅम्पातील रस्ते महापालिकेकडून बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने निर्बंध अशत: शिथिल केल्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पात गर्दी वाढायला लागल्याने महापालिकेने रस्ते बंद केले आहेत. कॅम्पातील प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. पत्रे लागून कॅम्पात प्रवेश करणारे रस्ते मंगळवारी रात्रीपासून बंद केले आहेत.

दरम्यान, पिंपरी कॅम्पात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. केवळ गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रस्ते बंद केले असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 10 मार्च ते 13 मे या 63 दिवसादरम्यान शहरातील 175 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. तो भाग महापालिकेकडून कंटेन्मेंट’ झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित केला जातो.

त्या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद केले जातात. परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई आहे.

पिंपरी कॅम्पातील मार्केटमधील रस्ते मंगळवारी महापालिकेने पत्रे लावून बंद केले. त्यामुळे परिसरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याची वार्ता पसरली. परंतु, कॅम्पात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. कॅम्पातील वाहतूक, गर्दी वाढली आहे. या गर्दीवर निर्बंध आणणे आवश्यक आहे.

त्यासाठी महापालिकेने मंगळवारी रात्री मार्केट, शगुन चौकातील रस्ते पत्रे लावून बंद केले आहेत. बाहेरील नागरिकांना कॅम्पात जावू दिले जाणार नाही. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रस्ते बंद केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.