Pimpri : शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची संसदेच्या राजभाषा समितीवर वर्णी

एमपीसी न्यूज – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी संसदेत आवाज उठविणारे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची भारतीय संसदेच्या राजभाषा समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे या यादीत पहिल्याच क्रमांकावर बारणे यांचे नाव आहे. दरम्यान, बारणे यांची नुकतीच संसदेच्या फायनान्स कमिटीच्या स्थायी सदस्य पदावर देखील नियुक्ती झाली आहे.

संसदेच्या राजभाषा समितीचे गठन करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये लोकसभेचे 20 आणि राज्यसभेतील 10 असे सर्वपक्षीय 30 संसद सदस्य आहेत. त्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग दुस-यावेळी निवडून आलेल्या बारणे यांची वर्णी लागली आहे.

बारणे यांनी मागील पाच वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने संसदेत आवाज उठविला होता. आता त्यांची राजभाषा समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. त्यांच्यासह महाराष्ट्रातील तीन खासदारांची वर्णी लागली आहे. त्यामध्ये बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव आणि काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांची वर्णी लागली आहे.

खासदार श्रीरंग बारणे सलग दुस-यावेळी निवडून आले आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये त्यांना सलग पाच वर्ष ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्यांचा लोकसभेतील अनुभव पाहता त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

याबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी मागील पाच वर्षात सातत्याने संसदेत आवाज उठविला आहे. आता या समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अधिक प्रयत्न करणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.