Pimpri: प्राधिकरणातील बाधित शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा मिळणार

मुख्यमंत्र्यांचे संबंधित विभागाला आदेश; आमदार महेश लांडगे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने जमिनी संपादित केलेल्या शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा विषय अखेर मार्गी लागला आहे. बाधित शेतक-यांना साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. 50 टक्के शेतक-यांना जागा देण्यात येणार असून प्राधिकरणाने संपादित केलेल्या 1500 चौरस फुटापर्यंतचे भूखंड शेतक-यांच्या नावावर करुन देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यतेखाली आज (सोमवारी) विधीमंडळात झालेल्या बैठकीला भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, मुख्यमंत्र्यांचे सचिव भूषण गगरानी, डॉ. नितीन करीर आदी उपस्थित होते.

  • पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरणातील बाधित नागरिकांना परतावा देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रत्येक अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले होते. याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने थेरगाव, रहाटणी, वाल्हेकरवाडी, काळेवाडी, निगडी, आकुर्डी, मोशीगाव, चिखली, भोसरी अशा दहा गावांमधील जमिनी संपादित केल्या होत्या. त्यामुळे शेतक-यांचे उदरनिर्वाहाचे साधन संपुष्टात आले होते. नियमानुसार शेतक-यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्याचा निर्णय आहे. परंतु, तो देण्यास प्राधिकरणाकडून विलंब केला जात होता. त्यामुळे शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती.

  • या बाधित शेतक-यांना परताव्या देण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामध्ये लाभार्थ्यांना साडेबारा टक्के जमीन परताव्याचे वाटप करण्यात येईल. यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतक-यांसाठी करत आसलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने समाधान आहे”.

त्याचबरोबर स्पाइन रस्त्यातील त्रिवेणीनगर-तळवडे येथील सुमारे 128 बाधित मिळकतधारकांची संख्या लक्षात घेता. प्रशासनाने दिलेली जागा कमी पडत होती. त्यासाठी वाढीव 7 हजार 800 चौरस मीटर जागा जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पेठ क्रमांक 12 मध्ये वाढीव जागा देण्याचा आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे, आमदार लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.