Pimpri : देशातील पहिले संविधान भवन उभारण्यासाठी प्राधिकरणाने जागा द्यावी

आमदार महेश लांडगे यांची प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – देशातील पहिले संविधान भवन औद्योगिकनगरीत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोकळ्या भूखंडाची जागा द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी प्राधिकरणाकडे केली आहे.

देशभरात आज संविधान दिनानिमित्त संविधानाचा जागर केला जात आहे. संविधान दिनाचे औचित्य साधत आमदार महेश लांडगे यांनी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह आज (सोमवारी) प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची भेट घेऊन संविधन भवनासाठी जागा देण्याची मागणी केली. यावेळी महापौर राहुल जाधव, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, नगरसेविका भीमाबाई फुगे, हिराबाई घुले, साधना मळेकर, सुवर्णा बुर्डे, स्वीनल म्हेत्रे, कमल घोलप, यशोदा बोईनवाड, निर्मला गायकवाड, नम्रता लोंढे, सारिका लांडगे, योगिता नागरगोजे आदी उपस्थित होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली होती. शहरात संविधान उभारण्याबाबत मुख्यमंत्री देखील सकारात्मक आहेत.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “भारत देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. विविध धर्म, जात, पंथ असूनही संविधानाने हा देश एकसंध बांधलेला आहे. या संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतातील पहिले संविधान भवन उभारावे. यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील जागा मिळावी. शहराच्या मध्यभागावर उभारणी झाल्यास संविधानाविषयी जागरुकता होण्यास मदत होईल. पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाकडे मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर देशातील पहिले संविधान भवन उभारण्यासाठी जागा देण्यात यावी”.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला आदर्श संविधान दिले आहे. संविधानामुळे आपला भारत देश एकसंध आहे. या संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करण्याची आवश्यकता आहे. भारतात कोठेही ‘संविधान भवन’ नाही. महाराष्ट्राला आणि पिंपरी-चिंचवड शहराला त्याचा मान मिळणार आहे. शहराच्या मध्यभागात संविधान भवनाची उभारणी झाल्यास संविधानाविषयी जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल. या संविधान भवनाच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती करण्यात येईल. संविधान भवन झाल्यास भारतातील पहिले भवन शहरात असणार आहे. यामुळे शहराची मान उंचावणार आहे. सकारात्मक दृष्टीकोनाने विचार करुन संविधान भवनासाठी जागा देण्यात यावी, असेही आमदार लांडगे म्हणाले.

नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ”संविधान भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. संविधान भवनसारखी वास्तू जर संपूर्ण संविधान जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शहरात उभा राहत असेल. तर, हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय एकतेचा सन्मान आहे. संविधानातील नैतिक मूल्ये समाजात रुजविण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग आला आहे”

संविधान भवनाची वैशिष्ट्ये!

संविधान अभ्यास केंद्र असणार आहे. त्यामध्ये तज्ज्ञांचे संविधानावर अभ्यास वर्ग, कार्यशाळा घेतल्या जातील. याशिवाय इतर राष्ट्रांच्या घटना तुलनात्मक अभ्यासासाठी उपलब्ध असतील. ‘ई’-लायब्ररी, संविधानविषयी विविध पैलू चित्रकला दालन, यूपीएससी, एमपीएससी अभ्यासिका व अभ्यासवर्ग सुरु केल्या जाणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.