Pimpri : राजस्थानमधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार तिघांच्या मुसक्या आवळल्या

पिंपरी-चिंचवड खंडणी दरोडाविरोधी पथकाची कामगिरी

एमपीसी न्यूज – श्रीगंगानगर राजस्थान येथील पुराणी अबाधी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या तीन सराईत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी-चिंचवड खंडणी दरोडा विरोधी पथकाला यश आले आहे. लांडेवाडी, भोसरी येथे मोबाईल आणि पैसे चोरल्याच्या आरोपाखाली तिघांना वाकड येथील छत्रपती चौकातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी राजस्थान येथे खून केल्याची माहिती दिली.

जगदीश बीरबल राम जाखड (वय 37), अभिषेक गोपाल गौर (वय 24) आणि रजत सुभाष चौधरी (वय 21, सर्व रा. पुराणी आबादी, गंगानगर, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडेवाडी भोसरी येथे एका व्यक्तीचे मोबाईल आणि पैसे चोरीला गेले. याबाबत त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना वाकडमधील छत्रपती चौकात वरील तिन्ही आरोपी संशयितरीत्या थांबलेले दिसले. खंडणी दरोडा विरोधी पथकाने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी लांडेवाडी भोसरी येथून मोबाईल आणि पैसे चोरल्याचे सांगितले.

सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना आरोपींनी श्रीगंगानगर राजस्थानमधील पुराणी अबाधी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा गुन्हा केल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांनी राजस्थान पोलिसांकडे चौकशी केली असता आरोपी जगदीश याच्यावर दहा हजार रुपये, तर अन्य दोन्ही आरोपींवर प्रत्येकी पाच हजार रुपयांचे राजस्थान पोलिसांनी बक्षीस जाहीर केले होते. मागील एक वर्षापासून या गुन्ह्यात तिन्ही आरोपी फरार होते.

  • तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी राजस्थान पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. आरोपी जगदीश जाखड याच्यावर राजस्थान मधील विविध पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, कट रचणे, दंगा, अडवून ठेवणे, अतिक्रमण, गृह अतिक्रमण, चोरी करण्यासाठी मृत्यू किंवा गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे एकूण सोळा गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी अभिषेक गौर याच्यावर खून, दंगा, अडवून ठेवणे अशा प्रकारचे तीन गुन्हे दाखल आहेत. तर रजत चौधरी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, शैलेश सूर्वे, उमेश पुलगम, किरण काटकर, शरीफ मुलानी, किरण खेडकर, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, प्रवीण कांबळे, सागर शेडगे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.