Pimpri : विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी साकारले विविध प्रयोग

एमपीसी न्यूज – बालवैज्ञानिकांच्या प्रयोगशीलतेला वाव मिळून वैज्ञानिक निर्माण व्हावेत, या उद्देशाने जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमधील नवीन तंत्रज्ञानाची एक वेगळी जोड या ठिकाणी पाहायला मिळाली.

हस्तकला, प्रयोग आणि विज्ञान या तिन्हीच्या संयोगातून भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन रासायनिक अभिक्रियेअंतर्गत स्प्रे मारून अदृश्य अक्षरे दृश्यमान करण्याच्या प्रयोगाने सायन्स पार्कचे सहायक शैक्षणिक अधिकारी नितीन गाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

  • यावेळी वडगाव मावळ येथील ऍग्रीकल्चर रिसर्च सेंटरचे अधिकारी डॉ. नरेंद्र काशीद, शिवाजी विद्यामंदिर संस्थेचे राजेश लगड, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, मधु दाणी, भटू शिंदे आदींसह शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम तयार करून त्याची प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये लेझर सिस्टटीमचा वापर करून घराची सुरक्षा कशी करता येते? यावर आधारित प्रयोग, सीमेवर टेहळणी करण्यासाठी उपयोगी पडणारे रडारचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखविले. पर्यावरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी प्रदूषण, इकोफ्रेंडली कार, सौर ऊर्जा, स्मार्ट सिटी संकल्पना, प्रदूषण नियंत्रण मॉडेल, भूकंपाची पूर्वकल्पना देणारे संयंत्र, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे मॉडेल अशा प्रकारच्या विविध प्रयोगातून उपयोग आणि दुष्परिणाम अशा वेगवेगळ्या संकल्पना विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडल्या.

  • शेतकरी आणि जवानांमुळे सामाज एकसंध राहतो, हे विविध रांगोळ्या आणि पीएसएलव्ही मॉडेलच्या माध्यमातून दाखविण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा होता. हस्तकलेच्या प्रदर्शनात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, रेखाचित्रे, कागदी वस्तू विद्यार्थ्यांनी मांडल्या होत्या. प्रदर्शन पाहण्यासाठी पालक, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रयोग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका प्रणाली पाटील, मंगल आढाव, श्रुती तावरे, नुपूर चौधरी, दीपिका शिळीमकर, सुमित्रा कुंभार, बिस्मिल्ला शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती तोडकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.