PMPML News: महापालिकेने 62 ई-बस खरेदीसाठी PMPML दिले 31 कोटी  

एमपीसी न्यूज –  पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) करिता 350 इलेक्ट्रीक बस (ई-बस) खरेदी करण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यातील 62 बस खरेदीसाठी पिंपरी महापालिकेच्या हिश्याचे 31 कोटी रुपये पीएमपीएमला देण्यास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. दरम्यान, निगडी, भोसरीत ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यास ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासही मान्यता देण्यात आली.

पुणे व पिंपरी-चिंचवड  शहर या दोन्ही शहरातील नागरिकांना सक्षम व अधिक चांगली वाहतुक सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुणे महानगर पालिका परिवहन उपक्रम व पिंपरी-चिंचवड महानगर परिवहन उपक्रम या दोन्ही उपक्रमांचे एकत्रीकरण करून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. या कंपनीची स्थापना केली. परिवहन महामंडळास एकत्रीत सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यास 19 ऑक्टोबर 2007 रोजी मान्यता मिळाली. पुणे, पिंपरी महापालिका पीएमपीएमएला संचलन तुट देत आहेत.

पीएमपीएमएलसाठी 350 ई-बस खरेदी करण्यात येणार आहेत.  त्यापैकी पिंपरी महापालिकेच्या हिश्श्याच्या 140 बस आहेत. प्रतिबसला 50 लाख रुपये सबसिडी आहे. त्यानुसार पालिकेस 70 कोटी रुपयांचा निधी पीएमपीएलला द्यावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 62 बस खरेदी करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी 31 कोटी रुपयांचा खर्च आहे. तो निधी  31 मार्चपूर्वी महामंडळास अदा करण्याची विनंती पीएमपीएमएल प्रशासनाने केली होती. पीएमपीएमएल निधी या लेखाशिर्षावर सन 2021-22 साठी बसेस खरेदीकरिता 70 कोटी रुपयांची तरतूद होती. त्यातून 31 कोटी रुपये पीएमपीएमएलला देण्यास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

पीएमपीएलच्या ताफ्यात सध्या 150 इलेक्ट्रीक बसेस आहेत. वर्षभरात 500 इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. या सर्व बससाठी शहरात इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. निगडीतील भक्ती शक्ती समुह शिल्प चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बसस्थानक येथे आणि भोसरी बीआरटीएस स्थानक येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. पीएमपीएमएलमार्फत हे इलेक्ट्रीक्ल व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी महापालिकेकडून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.