Pune : परदेशी विद्यार्थ्यांनी घेतला महाराष्ट्रातील लोककलांचा आनंद

एमपीसी न्यूज : पुनसीसी परेरा या श्रीलंकन विद्यार्थिनीने मेंडोलीन या (Pune)  वाद्यावर सादर केलेला भारतीय शास्त्रीय भिमपलास राग, अफगाणीस्तानातील अब्दुल मोबिन जैलानी या विद्यार्थ्याने म्हटलेली ‘मदिना’ तर ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संत कबीर यांच्या रचना आणि महाराष्ट्रातील लोककलांचे सादरीकरण असा सुरेख मेळ जुळून आला तो अनोख्या सांस्कृतिक कार्यक्रमात. निमित्त होते केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) 73 व्या स्थापना दिनाचे. सांस्कृतिक कार्यक्रमातून ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ची प्रचिती आल्याचे जाणवले.

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) स्थापना दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातातील ललित कला केंद्राच्या सहकार्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयसीसीआरच्या माध्यमातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांनी तसेच ललित कला केंद्रामधील विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाले. विद्यापीठातील नामदेव सभागृहात हा कार्यक्रम झाला.

ललित कला केंद्राच्या माजी विभाग प्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर, आयसीसीआरच्या विभागीय निदेशक निशी बाला, ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे, कार्यक्रम अधिकारी संजीवनी स्वामी, आयसीसीआरचे स्थानिक सल्लागार व्यंकटेश कल्याणकर, प्रशांत साठे, किशोर कोरडे, लिना आढाव आणि कल्याणी साळेकर (Pune) यांची प्रमुख उपस्थिती होती.

आरसीसीआरच्या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांना भारतात मिळत असलेली शिक्षणाची संधी आणि भारतीय संस्कृती, परंपरेची होत असलेली ओळख याबद्दल अफगाणीस्तानी विद्यार्थी वली रहेमान रेहमानी, नेपाळचा बिकिराज पांडे तर बांगलादेशची तसानिया तबस्सुम यांनी आयसीसीआरविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

संत कबीरांच्या रचना रोहन पोळ, अभिषेक शिंदे, अनुराधा मांडलिक, प्राची गोंडचावर यांनी सादर केल्या. त्यानंतर ललित कला केंद्राच्या तृतीय वर्षातील आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी गण, गौळण, लावणी, बतावणी, पोवाडा आणि वगनाट्याचे सादरीकरण केले.

डॉ. बहुलिकर म्हणाल्या, परदेशातील व्यक्तिंना आपल्या संस्कृतीत सामावून घेण्याची भारतीय परंपरा आहे. हीच परंपरा आयसीसीआरने जपली आहे. भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांमधील हे ऋणानुबंध असेच कायम राहावेत.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या प्रथमेश पारेकरला राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत ब्राँझ पदक

आयसीसीआरच्या विभागीय निदेशन निशी बाला यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि संस्थेच्या कार्याविषयी तर ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन पूजा खानोलकर या विद्यार्थिनीने केले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा ‘सीड कार्डस्‌‍’ देऊन निशी बाला यांनी सत्कार केला.

अफगाणीस्तान, बांगलादेश, गांबिया, नेपाळ, मॉरिशस, तजाकिस्तान, सेशेल्स आदी देशातून आलेल्या आणि आयसीसीआरच्या माध्यमातून पुण्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.