Pune : चाकण एमआयडीसीमधील वीजप्रश्न प्राधान्याने सोडविणार – प्रादेशिक संचालक अंकुश नाळे

एमपीसी न्यूज – औद्योगिक ग्राहकांच्या प्रतिनिधींशी सातत्याने संवाद साधून ( Pune ) चाकण एमआयडीसीमधील उद्योगांचे खंडित वीजपुरवठ्यासह इतर वीजप्रश्न सोडविण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येईल. सोबतच विविध योजनांद्वारे सुरु असलेल्या वीजयंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणाच्या कामांना गती देण्यात येईल अशी ग्वाही महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.

चाकण एमआयडीसीमध्ये मंगळवारी (दि. 17) महावितरण व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी नाळे यांनी औद्योगिक ग्राहक प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता युवराज जरग, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष दिलीप बटवाल, पदाधिकारी विनोद जैन, अनिल बजाज तसेच उद्योगांच्या 40 प्रतिनिधींची उपस्थिती होती.

प्रादेशिक संचालक नाळे म्हणाले, की औद्योगिक ग्राहक महावितरणसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या ग्राहकसेवेत अजिबात तडजोड केली जाणार नाही. चाकण एमआयडीसीमध्ये विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे अस्तित्त्वात असलेल्या वीजयंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी अतिभारित वीजवाहिन्यांचे विभाजन जलदगतीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Pune : दि विश्वेश्वर बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार 

तसेच उद्योगांचे स्थानिक वीजप्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याला ग्राहक प्रतिनिधींसोबत अधीक्षक अभियंतास्तरावर एक बैठक आयोजित करावी असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी उद्योग प्रतिनिधींनी स्थानिक वीजप्रश्न व अपेक्षांची माहिती दिली. त्यानुसार नाळे यांनी या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्याची स्थानिक अभियंत्यांना सूचना केली.

चाकण एमआयडीसीमध्ये सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून (आरडीएसएस) तीन नवीन उपकेंद्र व २ स्विचिंग स्टेशन्ससह 94 कोटी 30 लाख रुपये खर्चाचे विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेतून म्हाडा, भांबोली, वाकी येथे 33/22 केव्हीचे नवीन उपकेंद्र, कुरूळी व चाकण येथे 22/22 चे स्विचिंग स्टेशन तसेच 65 किलोमीटर भूमिगत व उपरी वीजवाहिन्यांचे विभाजन, 40 रिंग मेन युनिट, 83 नवीन वितरण रोहित्रे, 90 वितरण रोहित्रांची क्षमतावाढ, 85 किलोमीटर उच्चदाब वीजवाहिन्यांचे अपग्रेडेशन ( Pune ) आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

तसेच विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये 15 कोटी 49 लाख रुपयांची कामे सुरु आहेत. यात तीनपैकी ह्युंदाई 22/22 स्विचिंग स्टेशन कार्यान्वित झाले आहे. उर्वरित दोन नवीन स्विचिंग स्टेशन्स व इतर कामे येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी प्रादेशिक संचालक नाळे यांनी दिले.

दर्जेदार ग्राहकसेवेसाठी सध्याच्या चाकण उपविभागाचे विभाजन करून चाकण एमआयडीसी परिसरासाठी तसेच चाकण शहर, आळंदी शहर व इतर गावांसाठी दोन स्वतंत्र उपविभाग तयार करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता  राजेंद्र पवार यांनी दिली. या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे, सहायक अभियंता विक्रांत वरूडे आदींसह विविध कंपन्यांचे ग्राहक प्रतिनिधी उपस्थित ( Pune ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.