Pune Crime : मुंबईवरून येऊन घरफोड्या करणाऱ्या नेपाळी गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज – आपल्या साथीदारासह मुंबईवरून येत कोथरुड परिसरात घरफोड्या करणाऱ्या नेपाळी गुन्हेगाराला परिमंडळ तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ब्रॅंडेड कंपनीचे अनेक नवीन मोबाईल हॅन्डसेट, सोनी कंपनीचे किमती कॅमेरे व रोख रक्कम असा अंदाजे 2 लाख 10 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजकुमार परजित बीकेसिंग ( रा. रामबाग कॉलनी, कोथरुड, मुळगाव – नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलॉकची प्रक्रीया सुरु झाल्यानंतर कोथरुड परिसरात विविध दुकानाचे कुलपे तोडून घरफोडीचे सत्र सुरु झाले होते. त्यानुसार परिमंडळ तीनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. दरम्यान, या सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाचा एक इसम रामबाग कॉलनी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणाहून ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता अटक आरोपी याने त्याचा मुंबई येथील साथीदारासह कोथरुड परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

त्याच्याजवळून ब्रॅंडेड कंपनीचे अनेक नवीन मोबाईल हॅन्डसेट, सोनी कंपनीचे किमती कॅमेरे व रोख रक्कम असा अंदाजे 2 लाख 10 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपीकडून पुणे शहर व उपनगरातील इतर घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे व पोलीस उपनिरीक्षक संतोष पार्ले करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.