Pune : मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज- मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी युतीसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की, राज्यात भाजप सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी दिले होते. आज या सरकारला साडेचार वर्षाचा कालावधी झाला असून त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच धनगर समाजामुळे महादेव जानकर हे मंत्री मंडळात आहेत. ते देखील यावर काही बोलताना दिसत नाहीत. त्यांनी धनगर समाजाला वार्‍यावर सोडले आहे. त्यामुळे जानकरांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी तुपे यांनी केली.

तुपे पुढे म्हणाले की, मुस्लिम समाजाच्या आरक्षण बाबत देखील या सरकारने निर्णय घेतला नाही. ही निषेधार्थ बाब असून या सरकारने आरक्षणा संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.