Pune : सिलेंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीमध्ये आई आणि मुलगा जखमी

एमपीसी न्यूज- पुण्यात गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सिलिंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी 8 वाजता ही घटना घडली. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आई गंभीर स्वरूपात भाजलेली असून मुलगा किरकोळ जखमी झाला आहे.

अनुपमा किशोर जोशी (वय 55) आणि हिमांशू किशोर जॊशी (वय 30 रा. अहुरा सोसायटी, गुरुवार पेठ) अशी जखमींची नावे आहेत.

अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी यांचा घरगुती खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अनुपमा जोशी या मोठ्या कढईमध्ये सामोसे तळत होत्या. एका सिलेंडरमधील गॅस संपल्यामुळे त्यांनी दुसरा सिलेंडर शेगडीला जोडण्यासाठी त्याचे सील उघडताच सिलेंडरमधून गॅस गळती सुरु झाली. कोलीमध्ये खूप उष्णता असल्याने गॅसने पेट घेतला.

जोशी यांनी घाबरून सिलेंडरला धक्का देऊन तो आडवा पाडला. त्याचवेळी गॅस वेगाने घरात पसरून घरातील चीजवस्तूनी पेट घेतला. या घटनेत अनुपमा जोशी गंभीररित्या भाजल्या. तर हिमांशू जोशी किरकोळ स्वरूपात जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी शेजाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली गेली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना सूर्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याचप्रमाणे दोन्ही सिलेंडर अग्निशमन विभागाने आपल्या ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.