Pune : मुक्तसंगीत चर्चासत्रात उलगडली ‌‘कुमार गंधर्व गायकी व परंपरा’

एमपीसी न्यूज : कुमारजींची गायकी (Pune) म्हणजे देवधरांच्या विचारांची गायकी होय. देवधरांनी केलेल्या पारंपरिक कला विचारांच्या पुनर्मांडणीचे सातत्य कुमार गंधर्व यांनी ठेवले हे त्यांचे गायन क्षेत्रातील खरे योगदान आहे, अशा शब्दांत पंडित सत्यशील देशपांडे यांनी कुमारजींचे सांगीतिक व्यक्तिमत्त्व उलगडले. समकालीन गायकांच्या तुलनेत कुमारजी परफॉर्मर मानले जात नसले तरी त्यांच्या गायकीचा एक स्वतंत्र चाहता वर्ग होता. त्यांनी अनेक अस्पष्ट रागरूपे स्वच्छ केली, याकडेही पंडित देशपांडे यांनी लक्ष वेधले.

गानवर्धन आणि व्हायोलिन अकॅडमीच्या स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 41व्या मुक्तसंगीत चर्चासत्रातील दुसऱ्या दिवशी ‌‘कुमार गंधर्व गायकी व परंपरा’ या विषयावर पंडित कुमार गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य सत्यशील देशपांडे बोलत होते.

पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एस. एम. जोशी सभागृहात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, कोषाध्यक्ष (Pune) सविता हर्षे, सचिव रवींद्र दुर्वे, ललित कला केंद्राच्या माजी विभाग प्रमुख शुभांगी बहुलीकर स्वरमंचावर होते.

देशपांडे म्हणाले, अष्टांगांपैकी जेवढे आवश्यक तेवढचे अंग कुमारजी आपल्या गायकीत वापरायचे. ते ख्यालागणिक तंत्र बदलायचे. त्यांची तान स्वच्छ होती. कुमारजींनी अनेक गायकांच्या खुणा अभिमानाने बाळगल्या.

विविध घराण्यांच्या गायकांनी एकमेकांचे गाणे ऐकावे हे बीज गायकांमध्ये देवधरांच्या गायनशाळेत रोवले गेले. देवधरांनी गायनाचा रागविचार सर्वसमावेश केला.

अशा देवधर मास्तरांचे पंडित कुमार गंधर्व शिष्य होते. देवधरांचा सूक्ष्म विचार कुमारजींनी अधिक रंजक आणि प्रयोग शरण केला.

कुमार गंधर्व यांच्या गायकीचे सार म्हणजे निर्गुणी भजने असे म्हणणे चुकीचे आहे. कारण तो कुमारजींच्या समग्र गायकीमधील एक भाग होता, असे मत पंडित देशपांडे यांनी व्यक्त केले.

पंडित कुमार गंधर्व यांची गायन शैली उलगडून दाखविताना पंडित सत्यशील देशपांडे यांनी शुद्ध बिलावलमधील ‌‘मय तो लुभाय गयो रे’ तसेच शुक्ल बिलावलमधील स्वरचित ‌‘बलम बतिया जरा जरा मान ले’ या बंदिशींची झलक दाखविली.

‌‘मिया मल्हार’, ‌‘पूरिया कल्याण’, ‌‘कामोद’, ‌‘बिहाग’, ‌‘दरबारी’ अशा विविध रागांमधील ‌‘सखी मुख चंद्र’, ‌‘कैसे अधरिया .. मोरे मंदरवा’, ‌‘ए री माई जानेना दूंगी’, ‌‘ लागी रे मोरी नई लगन’, ‌‘शोभे जटा.. तु भोला रे’, ‌‘धरो रे मन धिम’, ‌‘संदेसवा मोरा’ या बंदिशी, भजन, कहेन सादर करताना कुमारजींच्या गायकीचे दर्शन घडविले.

ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देऊन पंडित देशपांडे म्हणाले, इंग्रजांचे आक्रमण झाले त्या वेळी कलाकारांना राजाश्रय देणाऱ्या वाजिद अली शाह यांना कलाकारांनी साथ दिली नाही.

या वेळी अनेक कलाकार बेघर होऊन मुंबई तसेच कोलकाता येथे पळून गेले. पुढे याच कलाकारांनी गायन क्षेत्रातील घराणी निर्माण केली.

कुमारजींनी कुठल्याही रागातील ख्यालाला एका ठराविक अष्टांगाच्या मुशीत टाकले नाही. त्यांची ही भूमिका चूक की बरोबर हे मी ठरवत नाही असे सांगताना जेव्हा एखाद्या घराण्याच्या गायकाचा ब्रँड होतो तेव्हा ते घराणे संपते अशी टिप्पणही देशपांडे यांनी केली.

कुमार गंधर्व कुणाला खूष करण्यासाठी गायले नाहीत हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य असेही त्यांनी सांगितले. अविनाश पाटील यांनी तबला साथ केली.

सुरुवातीस गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी मुक्तसंगीत चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. सूत्रसंचालन संस्थेच्या कार्यवाह डॉ. नीलिमा राडकर यांनी केले.

Pune : छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील मत्स्यालयामध्ये लागली आग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.