Pune : वखार महामंडळ चौकातील उड्डाण पूलाची माधुरी मिसाळ यांनी केली पाहाणी

एमपीसी न्यूज – सेव्हन लव्हज चौक ते मार्केट यार्ड टपाल कार्यालयापर्यंत प्रस्तावित असलेल्या उड्डाण पूल वखार महामंडळ चौकात उतरवून उजवीकडे मार्केट यार्डकडे वळवावा किंवा गंगाधाम चौकापर्यंत विस्तार करावा, अशा सूचना आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.

महापालिकेचे प्रकल्प प्रमुख श्रीनिवास बोनाला यांच्या समवेत मिसाळ यांनी मंगळवारी उड्डाण पूलाच्या कामाची पाहाणी केली. नगरसेवक प्रविण चोरबले, पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बाळासाहेब देशमुख या वेळी उपस्थित होते.

यावेळी माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘पुणे महापालिकेकडून सेव्हन लव्हज चौक ते मार्केट यार्ड टपाल कार्यालयापर्यंत उड्डाण पूल उभारला जाणार आहे. हा पूल मार्केट यार्डाच्या चौकात संपणार असल्याने येथे वाहतुकीची कोंडी होणार आहे. त्याचा नागरिकांना, ग्राहकांना आणि व्यापार्‍यांना त्रास होणार आहे. त्यामुळे हा पूल थेट गंगाराम चौकापर्यंत करावा.’

या प्रकल्पामुळे वखार महामंडळ चौकातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. गेल्या वर्षी अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आवश्यकतेनुसार वाढीव तरतूद उपलब्ध करून दिली जाईल. पुढील दोन वर्षांत उड्डाण पूलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

HB_POST_END_FTR-A2