Pune News : कंत्राटी शिपाई – रखवालदारांचे वेतन न दिल्यास आंदोलन ; महापालिका कामगार युनियनचा इशारा

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील कंत्राटी पद्धतीवर 103 शिपाई आणि 267 रखवालदारांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या‌ सेवकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना त्वरीत वेतन न दिल्यास‌ तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महापालिका कामगार युनियनने दिला आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक 285 शाळांमधून मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमातून शिक्षण दिले जाते. या शाळांच्या इमारतीची देखरेख कंत्राटी रखवालदारांमार्फत केली जाते. तसेच कंत्राटी शिपाई शालेय स्वच्छतेचे व टपाल पोहोचवण्याचे काम करतात. मात्र, त्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही.

गेली दोन महिन्यापासून या‌ सेवकांना वेतन मिळालेले नाही, त्यामुळे या‌ सेवकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याबाबत प्रशासनाशी लेखी पत्रव्यवहार करून, चर्चा करून देखील वेळेवर वेतन करण्यासाठी तिढा अद्याप पर्यंत सुटलेला नाही. या‌ सेवकांचे थकीत वेतन त्वरीत न दिल्यास युनियनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगार युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड उदय भट यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.