Pune News : आणीबाणीचा स्मरणदिन, काँग्रेस सरकारचा काळा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत विशेषत: युवकांपर्यंत पोहोचला पाहिजे : देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – आणीबाणीद्वारे लोकतंत्र संपवण्याचा घाट काँग्रेसने घातला होता. शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला होता. लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रयत्न होता. एका परिवाराने सत्तेसाठी तानाशाही केली. या काळात भारताने पाकिस्तान सारखी तानाशाही अनुभवली. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय विचारांच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष काय असतो हे दाखवून दिले. आमच्या लोकशाही संग्राम सेनानीनीं 21 महिने युद्ध चालवले. अखेर इंदिरा गांधींना आणीबाणी मागे घ्यावी लागली. संघर्षातून लोकशाही भारतीय नागरिकांनी परत आणण्याचे काम केले. या देशाची लोकशाही शाबूत ठेवली. सर्वांना संविधानाद्वारे लोकशाहीचे अधिकार प्राप्त झाले. त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाबरोबर भारतीय लोकशाहीचा इतिहास महत्त्वाचा आहे. म्हणूनच आणीबाणीचा स्मरणदिवस काँग्रेस सरकारचा काळा इतिहास सामान्य माणसापर्यंत विशेषत: युवकांपर्यंत पोहोचला पाहिजे असे मत विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आणीबाणीच्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मेधा कुलकर्णी, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दीपक नागपुरे, दत्ता खाडे, राजेश येनपुरे, प्रभारी धीरज घाटे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांची प्रमुख उपस्थिती  होती.

फडणवीस पुढे म्हणाले, ‘निवडणुकीत सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिराजींवर निवडणुक लढण्यासाठी सहा वर्षांची बंदी घातली. त्यानंतर कॅबिनेटची मंजुरी न घेताच इंदिराजींनी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने आणीबाणी लादली. त्यांचा दरार आणि दरारा होता. राष्ट्रपती, न्यायालय, संसद हे तीनही स्तंभ आणीबाणीने उद्धस्त केले. लोकशाहीचा चौथा स्तंभ वर्तमानपत्रांवर निर्बंध आणले. सरकारच्या विरोधातील बातम्या छापण्यावर बंदी घातली. वृत्तसंस्था, मनोरंजन क्षेत्रावर मर्यादा आणल्या. लोकांपर्यंत माहिती पोहोचण्याचा कुठलाच मार्ग राहिला नाही. लोकांवर अत्याचार करण्यात आले. लग्न ही न झालेल्या व्यक्तिंच्या  जबरदस्तीने कुटुंब नियोजनच्या शस्त्रक्रिया केल्या. सर्व विरोधी नेत्यांची धरपकड करून तुरुंगात टाकले. आणीबाणी विरोधात अकरा लाख लोकांना तुरूंगात डांबले. त्यांच्या कुटुंबांवर अत्याचार केले. अनेकांची घरेदारे, संसार उद्धस्त झाले. सरकारच्या अन्याया विरोधात प्रचंड जनआंदोलन उभे राहिले. या आंदोलनासमोर सरकारला झुकावे लागले आणि आणीबाणी मागे घेण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या काळात व्यवस्था उभ्या केल्या. पुढच्या सरकारला मर्जीने आणीबाणी लावता येणार नाही असे प्रावधान या लढ्याने केले. भविष्यात कधीही कोणीही भारताची लोकशाही विरोधात धजावणार नाही. असा कोणी प्रयत्न केलाच तर पाहिजे ते बलिदान करण्याची आमची तयारी आहे हा संदेश आजच्या निमित्ताने द्यायचा आहे.’

आणीबाणीत कारावास भोगलेले खासदार बापट आपले अनुभव कथन करताना म्हणाले, स्वातंत्र्यानंतर या देशातील नागरिकांना स्वकीयांविरोधात करावे लागलेले हे आंदोलन होते. भयानक दहशत, दादागिरी, अरेरावी सहन करावी लागली. हे सगळे असताना कार्यकर्ता तुरूंगाला घाबरला नाही, देशाच्या हिताच्या दृष्टिने कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर दुसर्यांदा स्वातंत्र्याची लढाई जिंकली. भविष्य काळात वाईट नजरेने बघण्याचा विचार केला तर भुईसपाट करू असा संकल्प केला पाहिजे. त्यासाठी वैचारिक बैठक पक्की असणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा सत्याग्रह करावे लागेल तेव्हा तेव्हा अन्यायाविरोधातील लढ्यात सक्रीय असले पाहिजे. कार्यकर्त्याने मातृभूमीच्या वैभवासाठी आयुष्यभर लढण्याची तयारी ठेवली पाहिजे.

युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर यांनी स्वागत, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रास्ताविक, दीपक पवार यांनी सूत्रसंचालन अभिजीत राऊत यांनी आभार प्रदर्शन केले.

 

महाराष्ट्र आणीबाणीकडे चालला आहे का?
फडणवीस म्हणाले, ‘आणीबाणीमुळे लोकशाहीच्या चारही स्तंभांवर नियंत्रण घालण्यात आले. संसदेत कुठलेही आयुध नाही, प्रश्नोत्तराचा तास नाही असे निर्बंध लावण्यात आले. राज्यात मागील वर्षी झालेल्या दोन दिवसांच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यात आला. तेव्हा इंदिराजींनी ज्या आणीबाणीकडे देशाला नेले, त्याच आणीबाणीकडे महाराष्ट्र चालला आहे का? असा विचार मनात आला.’

तेव्हा तुम्ही काय करत होता?
आजकाल लोकशाहीवर संकट आहे उठसुट म्हणणाऱ्यांना माझा सवाल आहे जेव्हा लोकशाहीवर खरे संकट होते तेव्हा तुम्ही काय करत होता?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.