Pune News : मंगल कार्यालयांचा मिळकतकर वाणिज्यऐवजी घरगुती दराने घ्यावा : आ. डॉ.नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज : राज्यातील मंगल कार्यालये मोठ्या अडचणीत आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील मंगल कार्यालय संघटनेच्या शिष्टमंडळाने विधानपरिषद उपसभापती आ. डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट घेत त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. त्यावर गोऱ्हे यांनी महापालिकेने मंगल कार्यालयांचा कर व्यापारी पद्धती ऐवजी घरगुती वापराच्या नियमानुसार घ्यावा, असे लेखी पत्र राज्यसरकारला पाठविले.

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पत्र दिले आहे.

राज्यातील मंगल कार्यालयासाठी विवाह प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींसाठी 200 ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तथापि काही मंगल कार्यालये ही आकाराने मोठी आहेत.

त्यामुळे साधारणतः चाळीस चौरस फुटासाठी एक व्यक्ती या प्रमाणात मंगल कार्यालयांच्या क्षेत्रफळावर आधारित व्यक्तींना परवानगी दिल्यास, सुरक्षित सामाजिक अंतराचे पालनही होईल. तसेच मोठ्या मंगल कार्यालयांना काही प्रमाणात अधिक उत्पन्न मिळू शकेल, अशी मागणी गोऱ्हे यांनी पत्रात केली आहे.

त्याच प्रमाणे मंगल कार्यालयात नागरिकांच्या उपस्थितीच्या मर्यादेमुळे तसेच मार्च 2020 पासून कोरोना 19 मुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन केले होते. त्यामुळे सर्व व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. परंतु, त्यांचे दैनंदिन खर्च, लाईट बिल, पाणीपट्टी, घरपट्टी यामुळे ते आर्थिक विवंचनेत मध्ये आहेत.

त्यामुळे सर्व महापालिकांनी मंगल कार्यालये व लॉन्स यांच्यासाठी मिळकतकर (Property Tax) वाणिज्य दराने (Commercial Rate) आकारण्यात येतो, तो कमी करून कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीसाठी तो घरगुती दराने (Residential Rate) वसूल करण्याच्या सूचना संबंधित महानगरपालिका व नगरपालिकांना यांना देण्यात यावेत याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र पत्राद्वारे सूचना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.