Pune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे पुण्यातील हॉटेल व्यावसायिक प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. काही हॉटेल तर बंद होण्याच्या स्थितीत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी आता हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार आहे. तशा प्रकारचे आदेश लवकरच काढण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

पुणे महापालिकेकडून सध्या लॉकडाउनच्या वेळांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामध्ये महापालिकेचे कर्मचारी सायंकाळी सात वाजल्यानंतर सुरू असलेली रेस्टॉरंट बंद करत आहेत. लॉकडाउनच्या वेळांचे उल्लंघन केले म्हणून महापालिकेने काही रेस्टॉरंट सील केली असून, काहींना दंड ठोठावला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन ‘शहरातील रेस्टॉरंटना पार्सल, टेक अवे सेवा देण्यास रात्री अकरापर्यंत मुभा द्यावी,’ अशी मागणी केली.

त्याला महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर, हॉटेलमध्ये जेवणासाठी आता ग्राहकांना परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हॉटेल बंद असल्याने कामगारांचा पगार कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. अनेकांना रोजगार बुडण्याचीही भीती आहे. त्यावर शासनाने सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.