Pune News : निरीक्षणगृहातील विधिसंघर्षित बालकांसाठी ‘झुंड’चे विशेष स्क्रिनिंग, नागराज मंजुळे यांनी लावली उपस्थिती

एमपीसी न्यूज – लहान वयातच गुन्हेगारी जगाशी सबंध आलेल्या अल्पवयीन मुलांसाठी ‘झुंड’ या हिंदी चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले. येरवडा येथील निरीक्षणगृहात रविवारी (दि.20) आयोजित या शोसाठी झुंडचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी खास उपस्थिती लावली. झुंड पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. येथून बाहेर पडल्यावर आम्ही कधीच गुन्हेगारीकडे वळणार नाही असा विश्वास मुलांनी यावेळी बोलून दाखवला. संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले.

निरिक्षणगृहात विशेष स्क्रिनिंगसाठी प्रमुख न्यायदंडाधिकारी मनीषा परदेशी, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव पी. डी. सावंत, किरण बाडुळे, बाल संरक्षक अधिकारी परम आनंद, अमित शिंदे, हनोक पुजार, गौरव खटाने, अमोल करडक, रोहित पाटोळे, रिचर्ड स्तानिस्लाऊल, अमित चेथ्री, प्रतिक फुलपगार, अनिकेत अडागळे, झुंड चित्रपटामधील डॉनची भूमिका साकारणारे अंकुश गेडाम, भावना साकरणारी सायली पाटील, बाबूची भुमिका केलेला प्रियांशू ठाकूर आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

येरवडा येथील निरिक्षणगृहातील जवळपास 55 विधिसंघर्षित बालकांना झुंड चित्रपट दाखविण्यात आला. झुंडचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि चित्रपटात भूमिका केलेल्या कलाकारांनी देखील या मुलांसोबत चित्रपट पाहिला. यावेळी विधिसंघर्षित मुलांनी ‘झुंड’च्या टीम सोबत संवाद साधला.

गुन्हेगारी जगाच्या मागे न धावता यशाच्या मागे धावण्यात खरा अर्थ आहे, याचा प्रत्यय चित्रपट पाहताना आला अशी प्रतिक्रिया मुलांनी यावेळी दिली. झोपडट्टीमधील वंचित मुलांना योग्य शिक्षण, मार्गदर्शन आणि सुविधा मिळाल्या तर, लहान वयातच गुन्हेगारीकडे वळणारी मुले चांगल्या गोष्टी करतील आणि हे चित्र बदलेल. तसेच, झुंड चित्रपट पाहून आम्हाला चांगला मार्गावर आयुष्य जगायचे आहे असा निर्धार आम्ही केला आहे आणि येथून बाहेर पडल्यावर आम्ही बदल्यालो असेन असा विश्वास यावेळी विधिसंघर्षित मुलांनी बोलून दाखवला.

झुंडचे दिग्दर्शक नागराज मुंजळे यांनी मुलांना मार्गर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले. नागराज मुंजळे म्हणाले, ‘झोपडपट्टी हा एक मोठा वर्ग आहे आपल्या देशात या ठिकाणी मोठी क्षमता आणि टॅलेन्ट असलेली मुले आहेत. असलेली शक्ती चुकीच्या दिशेने खर्च केली जात आहे. त्याला दिशा देणे गरजेचे आहे. झुंड हा चित्रपट पाहून जर आज मुलांना प्रेरणा मिळाली असेल आणि त्यांनी चुकीच्या प्रवृत्तीतून बाहेर पडण्याचा निर्धार केला असेल तर, हे झुंड या चित्रपटाचे यश आहे. सकारात्मक बदल हाच या चित्रपटाचा उद्देश आहे. असे चित्रपट निर्माण व्हायला पाहिजेत.’
निरिक्षणगृहाचे अधीक्षक जी. एन पडघण म्हणाले, ‘विधिसंघर्षित बालकांना कायद्यानुसार शिक्षा देता येत नाही. या मुलांमध्ये सुधारणा करून त्यांची मानसिकता कशी बदलता येईल यासाठी प्रयत्न केला जातो. यासाठी या मुलांचे समुपदेशन केले जाते, मानसशास्त्रज्ञ यांच्या मदत घेतली जाते, कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे असे उपक्रम केले जातात. झुंड चित्रपट पाहून सर्वच मुलांनी आयुष्य चांगले मार्गाने जगण्याचा निर्धार केला आहे, ही सकारात्मक बाब आहे’ असे पडघण म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.