Pune News : संभाजी बिडी प्रकरणी साबळे वाघिरे उद्योग समूहावर गुन्हा दाखल

शिवधर्म फाउंडेशनने केली तक्रार

एमपीसीन्यूज : व्यसनाचा पदार्थ असलेल्या बिडीला दिलेलं छत्रपती संभाजी महाराजांचे नाव हटवा, या मागणीसाठी महाराष्ट्र शिवधर्म फाउंडेशन या संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या संघनेतील काही पदाधिकारी पुरंदर किल्याच्या पायथ्याला उपोषणाला बसले होते. पाच दिवसानंतर संबंधित बिडी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.

शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी काल, मंगळवारी सासवड पोलीस ठाण्यात साबळे वाघिरे व्यवसाय समूहाच्या चेअरमन आणि संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवधर्म फाउंडेशनचे दिपक काटे, मच्छिन्द्र टिंगरे, सुनील पालवे, सागर पोमण, रवी पडवळ, दिनेश ढगे हे कार्यकर्ते चार सप्टेंबर पासून पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला उपोषणाला बसले होते. 8 सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजता सासवड पोलिसांनी या उपोषणकर्त्यांवर गुन्हा दाखल करून अटक केली.

मात्र, तरीही उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली.

त्यानंतर त्यांना जेजुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या दरम्यान तहसीलदार रुपाली सरनोबत, पोलीस उपनिरीक्षक हाके यांनी कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपोषण सोडण्याची मागणी केली.

त्यावर उपोषणकर्त्यांनी संभाजी बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

त्यानुसार कंपनीचे मालक आणि संचालक मंडळावर छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अपमान करत असल्याचा गुन्हा सासवड पोलिसांनी दाखल केला. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण माघारी घेतले आहे..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.