Pune : पुणेकरांचे ‘फॅमिली डॉक्टर’, पुण्यभूषण डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील ज्येष्ठ व निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. तथा हणमंत विद्याधर सरदेसाई (वय 86) यांचे वृद्धापकाळाने काल (रविवारी) निधन झाले. पुणेकरांचे ‘फॅमिली डॉक्टर’ म्हणून ते ओळखले जात. डॉ. सरदेसाई यांच्या पार्थिवावर काल (रविवारी) रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरदेसाई यांच्या पाठीमागे पत्नी डॉ. कुंदा, चिरंजीव डॉ. सुहृद, सून डॉ. संगीता, कन्या अमला, जावई भरत फाटक व नातू डॉ. सनत असा परिवार आहे. सरदेसाई यांचा जन्म 10 एप्रिल 1933 रोजी झाला. मुंबईत 1955 मध्ये ‘एमबीबीएस’ आणि 1958 मध्ये ‘एमडी (मेडिसीन)’ ही पदवी प्राप्त केल्यानंतर डॉ. सरदेसाई उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विषयात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एमडी पदवी घेऊन ते 1960 मध्ये भारतात परतले व त्यांनी रुग्णसेवा सुरू केली.

पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर कुंटे चौकात त्यांनी दवाखाना सुरू केला. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच लेखन आणि व्याख्यान या माध्यमातून त्यांनी आरोग्याबद्दल व्यापक जनजागृतीचे काम केले. पुण्याच्या सार्वजनिक जीवनाशी एकरूप होऊन ते शहराच्या आरोग्य व्यवस्थेचे आधारवड झाले. वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जायचे. डॉ. सरदेसाई यांनी 1985 पर्यंत बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये शिकविण्याचे काम केले. लोकांना व्याख्यान देताना ते पूर्णपणे मराठी भाषेचा वापर करीत असत. ते सूचनापत्रे, म्हणजेच प्रीस्क्रिप्शनही मराठीत लिहीत. औषध कसे घ्यावे, या सूचना ते मराठीत लिहीत. डॉ. सरदेसाई अनेक संस्थांचे सक्रिय पदाधिकारी होते.  डॉ. सरदेसाई यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली. तसेच त्यांचे अनेक संशोधनपर लेख विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले. ‘पुण्यभूषण’ पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.