Aundh: शहीद जवानांच्या वीरपत्नी व वीरमाता सुद्धा एक योद्धाच असतात -मीरा मिस्त्री

एमपीसी न्यूज – मराठा रेजिमेंट एक उत्कृष्ट रेजिमेंट असून देश रक्षणासाठी सदैव तत्पर असते. भारतमातेच्या रक्षणासाठी ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. जावान  देशासाठी बलिदान देत असतात. साहस हीच खरी योद्ध्याची ओळख असते. शहीद जवानांची वीरपत्नी व वीरमाता सुद्धा एक योद्धाच असतात, असे मत कर्नल ऑफ रेजिमेंट असित मिस्त्री यांच्या पत्नी मीरा मिस्त्री यांनी व्यक्त केले.

56 राष्ट्रीय रायफल मराठा लाईट इन्फंट्री कुपवाड यांनी काल (रविवारी) औंध मिलिटरी स्टेशन येथे आयोजित केलेल्या “अतूट बंधन” या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी कमान अधिकारी प्रणय पवार, मेजर रक्षित देशपांडे, शीखा कृष्णन, राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या सचिव शुभांगी सरोते, उपाध्यक्ष स्मिता माने व राष्ट्रीय रायफल मराठा लाईट इन्फंट्रीचे कुपवाडा येथे शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, वीर माता आणि नातेवाईक उपस्थित होते.

56 राष्ट्रीय रायफल मराठा लाईट इन्फंट्री यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी समजावून घेऊन, त्या सोडवणे, शहिदांचे परिवारातील वीरमाता व वीरपत्नी यांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी नऊ वीरपत्नींचा मीरा मिस्त्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी उपलब्ध असलेल्या योजना तसेच विविध उपक्रमांची माहिती असणाऱ्या पुस्तिकेचे  वाटप देखील वीर महिलांना यावेळी करण्यात आले.

यावेळी औरंगाबादच्या शिलाबाई दांडगे, बीड येथील भाग्यश्री राख, गुजरातच्या हेतल पवार, राजस्थान येथील मिना चौधरी, सांगलीतील सुनिता माने, सातारा मधील रेश्मा ढवळे,  परभणी मधील अंजना आंबोरी या वीर पत्नींचा तर कोल्हापूरच्या छाया इंगळे, सातारा  मधील  संगीता धायगुडे या वीर मातांचा  मीरा मिस्त्री यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित शीखा कृष्णन यांनी वीर महिलांची विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोणत्याही अडचणीमध्ये मदतीसाठी नेहमी तत्पर असल्याचे आश्वासन त्यांनी वीर महिलांना दिेले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कमान अधिकारी प्रणय पवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी जवानांनी स्वेच्छेने मदत केली असून आपण हे बंधन तयार केले आहे व ते अतूट देखील राखणार आहोत, असा विश्वास कमान अधिकारी प्रणय पवार यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती पवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सैनिक संस्थेचे सहाय्य मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.