Pune : पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेला मिळणार पाच कोटी रुपयांचा निधी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

दर्जेदार शिक्षणातून दर्जेदार रोजगार मिळेल - नितीन गडकरी

0 403

एमपीसी न्यूज – पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेला केंद्रीय मंत्रालयाकडून सीएसआर अंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. तसेच पुनरुत्थान समरसता गुरुकुलममधून मिळत असलेले शिक्षण अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करून त्यातून दर्जेदार रोजगारांची निर्मिती होईल, असा विश्वास देखील गडकरी यांनी व्यक्त केला.

HB_POST_INPOST_R_A

रस्ते वाहतूक व महामार्ग जल वाहतूक व जहाज बांधणी नदी विकास तसेच गंगा पुनरुत्थान विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला भेट दिली. यावेळी डिजिटल सायन्स लॅबचे त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच कुर्डुवाडी भागातील दहा आदिवासींना त्यांच्या हस्ते गायीचे वाटप तसेच भूमी वंदनाचा कार्यक्रम देखील त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

  • कार्यक्रमासाठी खासदार अनिल शिरोळे, खासदार श्रीरंग बारणे, शिपिंग कार्पोरेशन बोर्ड नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रदीप रावत, महाराष्ट्र राज्य मदत पुनर्वसन व पुनर्स्थापन महामंडळाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, लोक लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, चापेकर स्मारक समिती अध्यक्ष गिरीश प्रभुणे, शकुंतला बन्सल, सहकार्यवाह रवींद्र नामदे, कार्यवाह सतीश गोरडे, नितीन बारणे, गतिराम भोईर, अशोक पारखी आदी उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम ही संस्था भटक्या विमुक्त जमातींच्या मुलांच्या शिक्षणासाठी महत्वाचे काम करत आहे. या शाळेला अधिक दर्जेदार बनविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी मदत करायला हवी. सीएसआर निधीतून या संस्थेला पाच कोटी रुपये देण्यात येतील. यामुळे संस्थेला दर्जेदार शिक्षणात भर घालता येईल. संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांना संशोधनाच्या कामात जोडायला हवं. भारताला सुपर पावर करताना संशोधन क्षेत्रांची आमूलाग्र भर त्यात पडणार आहे. देशभरात संशोधन क्षेत्राला चालना मिळायला हवी.

  • भटक्या, विमुक्त, आदिवासी जमातींना उत्तम शिक्षण आणि संस्कार न मिळाल्याने त्यांच्याविषयी समाजात वेगळ्या प्रकारची चर्चा होते. त्यांना योग्य शिक्षण आणि संस्कार गुरुकुलम सारख्या संस्था करतात. त्यासाठी गिरीश प्रभुणे यांनी त्यांचे संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे. जातीयवाद आणि संप्रदायिकतेमधून मुक्त होऊन एक समाज म्हणून जोपर्यंत सर्व घटक एकत्र येत नाहीत तोपर्यंत प्रगती होणार नाही. शेतकरी आणि आदिवासी देशाला पुरेल एवढं पेट्रोल आणि डिझेल तयार करतील. नैसर्गिक तेलनिर्मिती क्षेत्रात काम करणं महत्वाचं आहे. यामुळे आदिवासी आणि शेतक-यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील.”

तिकीट कापलं तर नाराज होऊ नका – गडकरी
निवडणुकीचे तिकीट मिळण्यासाठी राजकीय मंडळी फार आटापिटा करतात. पण, ऐनवेळी पक्षाने तिकीट नाही दिले तर नाराज होतात. हा प्रघात मोठ्या प्रमाणात आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तिकीट मिळाले नाही, तर पक्ष देईल त्या उमेदवारासोबत उभे राहावे. स्वतःसाठी काम न करता पक्षासाठी काम करावे. पक्ष मजबूत होणं महत्वाचं आहे, असा सल्ला नितीन गडकरी यांनी राजकीय मंडळींना यावेळी दिला.

 

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: